आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते, कचरा, पाणीटंचाईचा विसर, उद्धव ठाकरेंना आठवलेच नाही एप्रिल महिन्यातील वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फक्त नि फक्त मेळावा तेवढा उरकला. शहरातील कचरा समस्या, १५० कोटींच्या रस्तेकामाचे अडलेले घोडे, औरंगाबादकरांना भेडसावत असलेली पाणीटंचाई, खासदार चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केलेला शहराच्या नामकरणाचा तसेच राजाबाजार येथे झालेल्या दंगलीचा मुद्दा यातील एकालाही हात घातला नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असल्याचे त्यांनी सांगितले खरे, पण आपला मुख्यमंत्री युतीतून होईल की स्वबळावर, हे मात्र स्पष्ट केले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा झाली. 'साहेबांनी युतीचे कांडके वाजवून टाकायला हवे होते. म्हणजे आपण कामाला लागायला मोकळे झालो असतो,' असे कार्यकर्ते परतताना म्हणत होते. 

 

फेब्रुवारीमध्ये शहराची कचरा कोंडी सुरू झाले. ५ एप्रिल रोजी ठाकरे शहरात आले असता त्यांनी कचरा कोंडीवरून औरंगाबादकरांची माफी मागतानाच ३० एप्रिलपर्यंत शहर स्वच्छ झाले पाहिजे, असे आदेश दिले होते. त्याचबरोबर ही समस्या लवकर सुटली नाही तर राजीनामा द्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. या समस्येवर माझे लक्ष कायम असेल, असेही सांगितले होते. त्यामुळे ठाकरे मंगळवारी शहरात


आले तेव्हा ते कचरा समस्येचे काय झाले, अशी विचारणा करतील, असे अपेक्षित होते. परंतु त्यांनी महापौरांना भेटीसाठी वेळही दिला नाही. सकाळी ते एका हॉटेलात थांबले होते. तेव्हा खरे तर ते महापौरांना भेटून वेगवेगळ्या मुद्द्यांचे काय झाले, याची विचारणा करू शकत होते. परंतु तसे झाले नाही. सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्हीही वेळात ते महापौर किंवा महापालिकेतील अन्य पदाधिकाऱ्यांना भेटले नाहीत. खैरे यांनी भाषणात राजाबाजार येथील दंगलीचा उल्लेख केला. दंगलीच्या वेळी हिंदूंच्या बचावासाठी शिवसैनिकच धावून गेला. तेथे एकही नव्हता, असे सांगितले. या मुद्द्याकडेही ठाकरे यांनी लक्ष दिले नाही. मोदींवर टीका, राम मंदिर या मुद्द्यावरच त्यांचे भाषण झाले. गटप्रमुख हाच पक्षाचा कणा असून तुम्हीच सत्ता मिळवून द्याल, असा विश्वास व्यक्त केला. मेळाव्यास पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्क नेते विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे, मनीषा कायंदे, प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, युवा सेना सचिव राजेंद्र जंजाळ, सभागृह नेते विकास जैन आदी उपस्थित होते. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सूत्रसंचालन केले. 

 

शहराच्या नामांतराचा साधा उल्लेखही नाही 

श्रीहरी पॅव्हेलियन येथे झालेल्या या मेळाव्यातील भाषणात खासदार चंद्रकांत खैरे यांनी शहराच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला. ८ मे १९८८ ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचे नाव बदलले होते. युतीच्या काळात तसा निर्णयही झाला होता. मात्र, पुढे कोर्टकचेऱ्या झाल्या. आता पुन्हा युतीची सत्ता आली तेव्हा भाजपचे मुख्यमंत्री संभाजीनगर असे नाव करण्यासाठी काहीही करत नसल्याचे खैरे आपल्या भाषणात म्हणाले. संभाजीनगर असे शहराचे नामकरण केले तर येथे शिवसेना आणखी मजबूत होईल, या भीतीपोटी भाजपकडून मुद्दाम नामकरण करण्यात येत नसल्याचा आरोप खैरे यांनी केला. आपल्या भाषणात ठाकरे यावर काय बोलतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. परंतु ठाकरे यांनी या मुद्द्याकडे डोळेझाक केली. 

 

बारमध्ये सोबत आले असते 
मी अयोध्येला जाण्याचे जाहीर केल्याबरोबर अनेकांच्या पोटात गोळा उठला आहे. कोणी सल्ले देतोय, तर कोणी टीका करतोय. मी राम मंदिरासाठी अयोध्येत चाललो आहे. त्यामुळे आरोप करताहेत. पण मी बारमध्ये गेलो असतो तर ते माझ्यासोबत आले असते, असे ठाकरे म्हणाले. 

 

भाजपच्या राज्यात आता लिंबही किडू लागले आहेत 

अलीकडे कडुलिंबाला कीड लागू लागली आहे. काँग्रेसच्या काळातही कडुलिंबाला कीड लागत नव्हती. परंतु भाजपच्या राज्यात आता लिंबही किडू लागले आहेत, अशा शब्दांत आपल्याच सरकारवर टीका केली. राज्यात दुष्काळ असला तरी आश्वासनांचा पाऊस मात्र जोरात असल्याचेही ते म्हणाले.
 
दैवत बदलणाऱ्या औलादींनी आम्हाला दैवत शिकवू नये 
ठाकरे यांनी नाव न घेता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर बोचरी टीका केली. ठाकरे अयोध्येला चालले आहेत, परंतु त्यांचे दैवत तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत, असे भुजबळ म्हणाले. याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, दैवत बदलणाऱ्या औलादींनी आम्हाला दैवत शिकवू नये. ते जामिनावर सुटले, पण अजून जमिनीवर आले नाहीत. तुम्ही आपला मोडकळीस आलेला पक्ष सांभाळावा, असा सल्ला दिला. त्यांनी स्वत: किती दैवते बदलली हे तपासावे, असेही ते म्हणाले. 

 

अजित पवारांना फिरकू देऊ नका 
मराठवाड्यात दुष्काळ आहे. धरणे कोरडी पडू लागली आहेत. तेव्हा कृपया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इकडे फिरकू देऊ नका. त्यांनी म्हणावे, तुम्ही तुमची रांजणे भरून घ्यावीत, अशी टीका केली. मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी तीन वर्षांपूर्वी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर हे भाष्य होते. 

 

बातम्या आणखी आहेत...