आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याला प्राधान्य, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार निवडल्यावर वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'माझे सरकार काेणाशी सुडाने वागणार नाही, मात्र कोणी आमच्या कोणी आडवे आले तर साेडणार नाही. चांगला महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र घडवण्याला व शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याला हे सरकार वचनबद्ध राहील', अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. वांद्रे येथील हाॅटेल ट्रायडंट येथे मंगळवारी रात्री काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, इतर घटक पक्ष व काही अपक्ष आमदारांची बैठक पार पडली. त्यात उद्धव बोलत होते. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उद्धव यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यानंतर उद्धव म्हणाले, 'संघर्षात कधी बाळासाहेबांची आठवण येत नाही, पण विजय मिळाल्यावर नक्की येते. पदाचा, शक्तीचा उपयोग जनतेसाठी करायचा माझ्या घरण्याची परंपरा आहे,' असे सांगत उद्धव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले. 'मुख्यमंत्रिपद निभावणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. मी आजपर्यंत काय गमावले, काय कमावले हा वेगळा प्रश्न आहे', असे स्पष्ट करत गेल्या ५० वर्षांत पक्ष वाढवण्यासाठी ज्या शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्या, त्या सर्वांना उद्धव यांनी नम्रपणे अभिवादन केले. मी पहिल्यांदाच आखाड्यात उतरलो आहे. पण, आपण सगळी मैदानातली माणसे आहोत. त्यामुळे मला वेगळे काही करावे लागणार नसल्याचे ते म्हणाले. जनतेला वाटले पाहिजे, हे माझे सरकार आहे, असा त्यांनी आमदारांना सल्ला दिला. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला अनेक काटे असतात, अनेक खिळे असतात, याची माहिती आहे. जाताना माजी मुख्यमंत्री आणखी दोन खिळे ठोकून जातो. पण, माझ्याकडे हाताेडासुद्धा आहे, असे ते म्हणाले. तसेच ३० वर्षे आम्ही ज्यांच्याशी मैत्री केली, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, पण ३० वर्षे ज्यांच्याशी वैर केले, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, असे भावनिक उद्गार उद्धव यांनी काढले.

शरद पवार-बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचा उल्लेख
शरद पवार आणि बाळासाहेबांच्या मैत्रीचा उल्लेख उद्धव यांनी केला. सुप्रिया सुळे यांच्या पहिल्या निवडणुकीवेळी सेनेने उमेदवार दिला नव्हता, याची आठवण त्यांनी काढली. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिल्याबद्दल पवार यांचे त्यांनी आभार मानत 'याला म्हणतात लोकशाही, याला म्हणतात मैत्री. हे काही देणं-घेणं नाही', असे उद्धव यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...