आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही कधीही डोळा मारून नाही, तर डोळ्याला डोळे भिडवून काम करतो - उद्धव ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर /अमरावती  - आमच्याकडे डोळा मारणारे कोणी नाही. आम्ही डोळा मारून नाही, तर डोळ्याला डोळे भिडवून काम करतो, असे सांगतानाच महाराष्ट्रात संपूर्ण ४८ जागा जिंकून विरोधकांचा सुपडा साफ करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले. शुक्रवारी नागपूर व अमरावती येथे भाजप-सेना पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलन मेळाव्यात ते बोलत होते. नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह पूर्व विदर्भातील भाजप-शिवसेना युतीचे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


दोन कडवट हिंदुत्ववादी पक्ष दुर्दैवाने दूर चालले होते. आता आमची मने स्वच्छ आहेत. आम्ही एकत्र आल्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. विरोधक जातीयवादाची विषपेरणी करीत आहेत. ही विषवल्ली निवडणुकीत उखडून टाका, असे ठाकरे म्हणाले.  
चांगल्याला चांगले म्हणण्याची आणि पटत नाही ते उघडपणे बोलण्याची ठाकरी परंपरा आहे. करायचे ते दिलखुलास आणि मनमोकळे हा आमचा स्वभाव आहे. म्हणून खुल्या दिलाने आणि खुल्या मनाने युती केली. देशात आणि राज्यातही विकासाचा झंझावात सुरू आहे. पन्नास वर्षांत केली नाही इतकी कामे पाच वर्षात झाली म्हणून युती केली, असे ठाकरे म्हणाले. 


आता पवार भाजपत नको
आमच्यातील संघर्ष दुर्दैवी होता. पण आता आम्ही मतदारसंघासोबत माणसेही जिंकतो. राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेवर टीका केली म्हणून त्यांना आडव्या हाताने घेण्याची तयारी केली, तर सुजय विखे भाजपत आले. नितीनजी आता मोदींना सांगा की, पवारांना भाजपत घेऊ नका. नाही तर टीका करण्यासाठी कोणी विरोधकच उरायचा नाही, अशी कोपरखळी ठाकरे यांनी मारली. या वेळी विदर्भातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


लोकसभेला ‘राम’ नव्हे ‘राष्ट्रवादा’चा मुद्दा : फडणवीस 
भाजप-शिवसेना युतीचा लोकसभा िनवडणुकीसाठी “राम’ नव्हे, तर राष्ट्रवादाचाच मुद्दा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत स्पष्ट करून कुलस्वामिनी अंबादेवी व संतांच्या पवित्र भूमीत प्रचाराचा नारळ फाेडला.‘कलतक जो नामुमकीन था वो आज मुमकीन है’ असे म्हणत यंदाच्या िनवडणुकीत राष्ट्रवाद हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा राहणार, असे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संबोधनातून वारंवार िदलेल्या दाखल्यांद्वारे िदसून आले. महामेळाव्याला अमरावती विभागातील चारही युतीचे उमेदवार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...