आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात पुन्हा भगवा फडकवणारच, देशात समान नागरी कायदा आणा : उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशाचे गृहमंत्री अमित शहा जसे बोलतात तसे करून दाखवतात. ३७० कलम रद्द व्हावे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मागणी होती ती या सरकारने पूर्ण केली. त्याचप्रमाणे आता देशातील घुसखोरांना हाकलून देशात समान नागरी कायदा त्यांनी आणावा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दसरा मेळाव्यात बोलताना अमित शहा यांना केले. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, दहा रुपयात गरिबांना जेवण आणि एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणी केंद्रांची राज्यात उभारणी करण्याचे आश्वासनही या वेळी राज्यातील जनतेला दिले. शिवसेनेचा ५४ वा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. मंचावर येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला वंदन केले. आपल्या जवळ-जवळ अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी राम मंदिरापासून अजित पवार यांच्या अश्रूंपर्यंतच्या मुद्द्यांना हात घालत कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवी आहे असेही त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे म्हणाले, या महिन्यात निवडणुका आहेत. विधानसभेवर आपण भगवा फडकवण्यास निघालो आहोत. आज दसरा आहे आणि २४ तारखेला आपण पुन्हा दुसऱ्यांदा विजयादशमी साजरी करणार आहोत. रामाने रावणाचा वध केला आणि अयोध्येला परत आल्यानंतर दिवाळी साजरी केली होती. रामाने रावणाचा वध केला परत आले आणि रामराज्य आणले तरी राम जन्मला की नाही यावर वाद सुरू आहे. राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्यावर जास्त बोलू नये, असे मला सांगितले आहे. मात्र, राम मंदिर व्हावे ही आमची इच्छा आहे आणि त्यासाठी विशेष कायदा करावा लागला तरी करावा अशी आमची मागणी आहे, असे म्हणत राम वचन पाळणारे होते. त्यामुळे राम मंदिर बांधायचे आणि वचन तोडायचे हे योग्य नाही, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला. १९९३ साली झालेल्या दंगलीत बाळासाहेबांमुळे मुंबई वाचली. परंतु यांनी  २००० मध्ये काय केले होते? एक अग्रलेख काढून शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू केले. आठवडा १५ दिवस महाराष्ट्र वेठीस धरला. बाहेरून पोलिस आणले. शेवटी बाळासाहेब स्वतःच न्यायालयात हजर झाले, यांनी तांत्रिक अटक दाखवली. न्यायालयाने खटला फेटाळला. त्यावेळी आम्ही कोणाकडे मदत मागायला गेलो नव्हतो. त्यावेळी त्यांच्या हातात सर्व यंत्रणा होत्या. आणि ते म्हणतात सूडाचे राजकारण केले जातेय. आम्ही सूडाचे राजकारण करीत नाही आणि कोणी करेल तर ते सहनही करणार नाही. 

अजित पवारांवर टीका
अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू आले. मगरीच्या डोळ्यात अश्रूंबाबत ऐकले होते, अजित पवारांच्या रुपाने मी ते अश्रू पाहिले. ते म्हणाले शेती करेन. पण शेतीसाठी धरणात पाणी नसेल तर काय करणार असा प्रश्न करत या अनुभवामुळेच आपण भाजपबरोबर युती केली, असेही ते म्हणाले. या वेळी शिवसेना नेते संजय राऊत आणि इतर नेत्यांची भाषणेही झाली. मेळाव्याला शिवसैनिक उपस्थित होते.