Home | Maharashtra | Mumbai | Uddhav Thackeray taunt Amit Shah

शिवसेनेला पटकणारा जन्माला यायचाय; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अमित शहांना टाेला 

विशेष प्रतिनिधी | Update - Jan 14, 2019, 07:00 AM IST

'सरकार मजबूर असले तरी चालेल, पण देश मजबूत असला पाहिजे,' असा टोलाही उद्धव यांनी हाणला.

 • Uddhav Thackeray taunt Amit Shah

  मुंबई- 'शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचा आहे,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच 'मजबूर सरकार की मजबूत सरकार' या पंतप्रधान मोदींच्या विधानाचा धागा पकडत 'सरकार मजबूर असले तरी चालेल, पण देश मजबूत असला पाहिजे,' असा टोलाही उद्धव यांनी हाणला. आपल्याच छाताडावर बसणारे सरकार असेल, तर ते चुलीत घालायचे नाही तर काय करायचे, असा सवाल करत त्यांनी थेट भाजपला आव्हान दिले.

  मुंबईतील वरळी येथे शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. आर्थिक निकषांवर आरक्षण, राममंदिर आणि युतीच्या मुद्द्यावर त्यांनी या वेळी भाष्य केले. मध्यंतरी शिवसेनेसोबतच्या युतीबाबत विचारले असता भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोबत न येणाऱ्या शिवसेनेला उद्देशून आगामी निवडणुकीत 'पटक देंगे' असे विधान केले होते. शहा यांच्या विधानाचा खरपूस शब्दांत समाचार घेताना शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचा आहे. आमची वाट भगवी असून जर तळपायाची आग मस्तकात गेली तर ती आग तुमचे सिंहासन भस्मसात करेल, असा हल्लाबोल उद्धव यांनी केला. ते पुढे म्हणाले की, 'आगामी निवडणूक फक्त तुमच्या-आमच्या नाही तर महाराष्ट्र आणि देशाच्याही भवितव्याची आहे. जर तुम्ही जनतेचा विश्वास कमावला असेल तर पानिपतचेच काय तर कोणतेही युद्ध जिंकता येते, असा टोलाही त्यांनी अमित शहांना लगावला. निवडणुकांच्या तोंडावर आता रडून भेकून मते मागितली जातील. मात्र निवडणुका या देव, देश आणि धर्मासाठी लढल्या गेल्या पाहिजेत.'

  अयाेध्येत राममंदिराच्या मुद्द्यावरही उद्धव ठाकरे यांनी या सभेत भाष्य केले. देशाचा प्रवास विचित्र पद्धतीने चालला असल्याचे सांगतानाच, राममंदिराचा मुद्दा आपण निवडणुकीसाठीच घेतल्याचे ते म्हणाले. ताकाला जाऊन भांडे लपवणाऱ्यांतले आपण नसून राममंदिराच्या मुद्द्यावर इतर पक्षांचा भंडाफोड करण्यासाठीच हा मुद्दा आपण घेतला आहे. माेदींचे नाव न घेता त्यांनी राममंदिराबाबत त्यांच्या भूमिकेवरही टीका केली.


  काँग्रेस राममंदिराच्या आड येत असल्याच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, 'काँग्रेस राममंदिराच्या आड कशी येते ते सांगा. जनतेने त्यांना एवढी मोठी शिक्षा दिली आहे की, काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकले नाही. नितीशकुमार, रामविलास पासवान यांच्यासारखे राममंदिराला विरोध करणारे सोबती घेऊन राममंदिर कसे बांधणार ?'

  ..तर आयकरही माफ करा
  आर्थिकदृष्ट्यात मागास लाेकांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच माेदी सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, 'जर ८ लाखांपर्यंतचे उत्पन्न असणारे देशातील लाेक जर आर्थिकदृष्ट्या मागास असतील, तर त्यांचा आयकर माफ करायला हवा. तसेच धनगर आरक्षणाबाबत हे सरकार काहीच बोलत नसल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला.'

Trending