आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 फेब्रुवारीला करणार अयोध्या दौरा, संजय राउत यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 7 फेब्रुवारी रोजी अयोध्या दौरा करणार आहेत. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राउत यांनी शनिवारी यासंदर्भातील माहिती दिली. महाराष्ट्र सरकारचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अयोध्येला जाणार असे सांगितले जात होते. आता याच दौऱ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, कुणीही अयोध्येच्या मुद्द्यावर राजकारण करू नये असे आवाहन पत्रकारांशी संवाद साधताना संजय राउत यांनी केले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना राउत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रार्थना करण्यासाठी अयोध्येतील राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते सरायू नदीजवळ आरती सुद्धा करतील. सरकारचे 100 दिवस पूर्ण होत असल्यानिमित्त हा दौरा आयोजित केला जात आहे. या दरम्यान, मुख्यमंत्र्यांसह हजारो शिवसैनिक सुद्धा अयोध्येला उपस्थिती लावतील. हा दौरा दिलेले आश्वासन पाळणे आणि श्रद्धा म्हणून पाहावे. यात कुठल्याही प्रकारचे राजकारण होऊ नये असेही ते पुढे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपने खरपूस टीका केली होती. ठाकरेंनी या दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना सुद्धा घेऊन जावे असा टोला भाजपने लगावला होता. त्यावर विचारले असता, अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन करतो. यासंदर्भात भाजप काय बोलते यावर आम्ही लक्ष देत नाही असे राउत यांनी स्पष्ट केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, 28 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा ठरणार आहे.