विधानसभा 2019 / युती राहीलच, यात शिवसेनेला सन्मानाने पुरेशा जागा मिळतील - उद्धव ठाकरेंनी पक्षातील नेते, मंत्र्यांसमाेर व्यक्त केला विश्वास

एकूण वातावरण पाहता भाजप स्वबळावर निवडणूक जिंकू शकतो - भाजपचा सर्व्हे 
 

विशेष प्रतिनिधी

Sep 21,2019 07:55:14 AM IST


चंद्रकांत शिंदे | मुंबई
शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार की नाही, या शंका-कुशंकांना स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी पूर्णविराम दिला. ‘आगामी विधानसभा आपण युतीतूनच लढणार असून शिवसेनेच्या सन्मानाप्रमाणे जागा मिळतील,’ असा विश्वास त्यांनी पक्षाचे प्रमुख नेते व मंत्र्यांच्या बैठकीत व्यक्त केला. शिवसेनेतील खात्रीशीर सूत्रांनुसार, भाजपकडून १३० ते १३५ जागा शिवसेनेला देण्याबाबत सहमती दर्शवण्यात अाली अाहे. रविवारी अमित शहांच्या उपस्थितीत त्यावर शिक्कामाेर्तब हाेण्याची शक्यता अाहे.


शिवसेना भवनात शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीला ठाकरेंसह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, दादा भुसे व संजय राठोड उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले, या बैठकीत मंत्र्यांनी सर्वात अाधी युती हाेणार की नाही, असा प्रश्न उपस्थित करत माध्यमातील चर्चांची माहिती दिली. तेव्हा उद्धव यांनी युती हाेणारच असल्याचे सांगून ‘आपण एकत्रच निवडणूक लढवणार आहोत. किती जागांवर लढणार, असा प्रश्न आहे. परंतु आपल्याला योग्य जागा मिळणार आहेत. त्याची चिंता न करता तयारीला लागा,’ अशी सूचना केली.


भाजपने शब्द पाळावा : संजय राऊत
पत्रकारांशी बोलताना उद्धव म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या वेळीच युतीचा फॉर्म्युला ठरला असून त्यानुसारच जागावाटप होत आहे. युतीत तिढा नसून एक-दोन दिवसांत युतीची घोषणा होईल.’ खा. संजय राऊत म्हणाले, लाेकसभेच्या वेळीच सत्तेचे समान वाटप ठरले हाेते. भाजपने शब्द पाळावा.


आता मनसेही लढण्याच्या तयारीत : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकाही न लढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पक्ष रिंगणात उतरण्याची शक्यता होती. मात्र रणधुमाळी सुरू होऊनही राज यांनी निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, मनसे १०० पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत असून राज लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती मनसेतील सूत्रांनी दिली.

X
COMMENT