आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंचे सरकार विधानसभेत आज मांडणार विश्वासदर्शक ठराव; बहुमतासाठी हवे 145 सदस्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बहुमतासाठी हवे 145 सदस्य, महाविकास आघाडीकडे 168
  • रविवारी नव्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक

​​​​​​मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव शनिवारी (दि. ३०) विधानसभेत मांडला जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. शनिवारी दुपारी सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असल्याने ठाकरे सरकारची ही पहिलीवहिली परीक्षा असणार आहे.

विधानसभेत शनिवारी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारबाबत विश्वासदर्शक ठराव शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मांडणार आहेत. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या धोरणाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषण करतील. नंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड होईल, अशी माहिती महाराष्ट्र विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.

दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेवरून वळसे-पाटील यांना हे पद देण्याच्या प्रस्तावाला राज्यपालांनी शुक्रवारी मान्यता दिली आहे.

२८८ सदस्यांच्या सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी १४५ सदस्यांचा पाठिंबा हवा असतो. शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, अपक्ष ७ व घटक पक्ष १० असे १६८ संख्याबळ आघाडीकडे आहे. त्यामुळे सरकार हा विश्वासदर्शक ठराव सहज जिंकू शकते.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील असतील विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
 
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे-पाटील सात वेळा विजयी झाले आहेत. २००९ ते २०१४ या काळात ते विधानसभा अध्यक्ष होते. वळसे पाटील यांनी काही काळ शरद पवार यांचे स्वीय सहायक म्हणून काम केले होते.

फडणवीस सरकार कोसळल्यावर मंगळवारी महाराष्ट्र विकास आघाडीने सत्ता स्थापण्याचा दावा राज्यपालांकडे केला होता. गुरुवारी ठाकरे व त्यांच्या मंत्रिमंडळाने शपथ घेतली. ३ डिसेंबरच्या आत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे, असे राज्यपाल यांनी निर्देश दिले होते.

शिवसेना व दोन्ही काँग्रेसचे आमदार मुंबईत आहेत. शिवाय बहुजन विकास आघाडीचे ३, समाजवादी पार्टीचे २, प्रहार जनशक्ती २, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे प्रत्येकी १ आमदार असून, ७ अपक्ष आमदार सध्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या पाठीशी आहेत.

शनिवारी महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. राज्यपालांनी हंगामी अध्यक्ष म्हणून केलेल्या नव्या नेमणुकीची प्रथम घोषणा होणार आहे. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून दिला जाईल. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. त्यावर मतदान होईल.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर २०१९ पासून नागपूर येथे सुरू होण्याची शक्यता आहे. ते अधिवेशन आठवडाभर चालेल, अशी माहिती विधिमंडळातील सूत्रांनी दिली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...