आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे फोटो प्रदर्शनातील निधी केरळ पूरग्रस्तांना देणार; सेना आमदार-खासदारही देणार महिन्याचे वेतन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- २०१५ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरवलेल्या छायाचित्र प्रदर्शनातून जमा झालेल्या रकमेतून काही रक्कम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केरळमधील पूरग्रस्तांना देणार असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एका ट्विटच्या माध्यमातून जाहीर केले. मात्र, त्यांनी ट्विटमध्ये २०१४ मध्ये प्रदर्शन भरवल्याचा उल्लेख केला आहे. शिवसेनेचे सर्व खासदार, आमदारही केरळमधील पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचा पगार देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 


२०१५ मध्ये ७ ते १३ जानेवारीदरम्यान मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरे यांनी छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनातील फोटो विक्रीतून ५ कोटी ११ लाख रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले होते. ही सर्व रक्कम शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. यातील ४.५ कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून दिल्याच शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले होते. त्यातील रकमेतून केरळमधील पूरग्रस्तांना मदत दिली जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

 
पूरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य पाठवले

आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, केरळमधील पूरग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना असून पूरग्रस्तांसाठी पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांचे एक महिन्याचे वेतन दिले जाणार आहे. ही रक्कम केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीस दिली जाणार आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २०१४ मधील छायाचित्र प्रदर्शनातून जो निधी उभारला गेला, त्यातून उद्धवजी मदत निधी सुपूर्द करणार आहेत. मिळालेल्या निधीतून आवश्यक ती सामग्रीही केरळला पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, पक्षाच्या ठाणे विभागाने पूरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य आणि कपडे मागील आठवड्यात केरळला पाठवले असून त्यांनी पक्षातील सहकाऱ्यांना मदतीचे आवाहन करत अन्न, कपडे, ब्लँकेट, औषधे देणे शक्य आहे त्यांनी मदत करावी, असे अपील करत एक संपर्क क्रमांकही जारी केला आहे. 


मंत्री महाजनांसह १०० डॉक्टरांचे पथक केरळकडे 
मुंबई- केरळ पूरग्रस्तांना आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली १०० डॉक्टरांचे पथक सोमवारी सकाळी केरळकडे रवाना झाले. जे. जे रुग्णालयाचे ५०, तर ससून रुग्णालयाचे २६ डॉक्टर, स्वयंसेवक व सहायकांसह १०० व्यक्तींचा चमूत समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी २० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यांच्या निर्देशानुसार केरळ पूरग्रस्तांसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षातून सातत्याने माहिती देण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...