maharshtra special / 'आमच्यात काहीही धुसपूस नाहीये, मुख्यमंत्रीपदाबद्दल माझे आणि अमित शाहांचे बोलणे झाले आहे, कोणालाही यात नाक खुपसण्याची गरज नाही' -उद्धव ठाकरे

भरपावसात झालेल्या या सभेत लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन भाषण ऐकले

दिव्य मराठी वेब

Jun 22,2019 06:53:00 PM IST

नाशिक- शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन कोणतीच धुसफूस नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रीपदबद्दल भाजपाध्यक्ष अमित शाह आणि माझे बोलणे झाले आहे. त्यामुळे कोणालाही मध्ये नाक खुपसण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हे उत्तर दिले.

उद्धव ठाकरे सध्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये त्यांची सभा झाली. भरपावसात झालेल्या या सभेत लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन भाषण ऐकले. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी भरभरुन मतदान केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी आभार मानले.

कर्जमाफीचे पैसे बँकांना दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, पण ते शेतकऱ्यांना का नाही मिळाले? यामध्ये घोटाळा झाल्याची शक्यता आहे. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यास राज्यातील सर्व पीक विमा कंपन्याची दुकाने बंद करु, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. शेतकरी मल्ल्या आणि निरव मोदी नाहीत, हे कष्टाचे पैसे आहेत. मुलांचे शिक्षण आणि लग्न कसे करायची याची चिंता शेतकऱ्यांसमोर आहे आणि आपल्याकडे काय तर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु आहे, असेही ते म्हणाले.

X
COMMENT