आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गांधीनगरमध्ये, करणार शक्ती प्रदर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई- ज्या भाजपच्या अध्यक्षांचा नेहमी ‘अफझल खान’ असा उल्लेख शिवसेना करत आली त्याच अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरताना शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत. एकूणच मुंबईत युतीची घोषणा करताना मागील सर्व काही विसरून आम्ही एकत्र आल्याचे सूचक उद्गार अमित शहा यांनी काढले होते. त्याचाच प्रत्यय उद्धव ठाकरे यांच्या शनिवारच्या गांधीनगर दौऱ्याने येत आहे. स्वतः अमित शहा यांनीच उद्धव ठाकरे यांना उपस्थित राहण्याची विनंती केली आणि ठाकरे यांनी ती मान्य केली, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.   


गांधीनगर मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी १९९८ पासून निवडून येत आहेत. मात्र, या वेळेस त्यांचे तिकीट कापून अमित शहा यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. शहा प्रथमच निवडणूक लढवत असल्याने ते  जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी प्रचंड तयारी करण्यात आली असून या वेळी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या वेळी एनडीएमधील अनेक नेतेही उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत हे देशातील जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी उद्धव यांना गुरुवारी अमित शहा यांनी आमंत्रण दिले. ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण भाजपशी युती करीत आहोत, असे म्हटले होते आणि तसे पोस्टरही लावण्यात आले होते. हेे शिवसेनेलाही दाखवून द्यायचे असल्याने उद्धव यांनी गांधीनगरला जाण्याचा निर्णय घेतला आहे.  

बातम्या आणखी आहेत...