आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या दमाच्या विद्रोही भीमकन्या...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उषा बोर्डे  

‘एक गीत माझ्या दहा भाषणांपेक्षा अधिक परिणामकारक आहे’ ही प्रतिक्रिया दिली होती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. वामनदादा कर्डक यांंचं गाणं ऐकल्यानंतर. दलित चळवळीच्या गाण्यांना मोठी परंपरा आहे. वामनदादा, विठ्ठल उमप अशा थेट आंबेडकरी चळवळीतील कवी-शाहिरांनी ही परंपरा सशक्त केली. भीमगीतांच्या माध्यमातून आंबेडकरांचे कार्य, त्यांचे विचार आणि महत्त्व समाजासमोर त्यांनी आणले. प्रल्हाद, आनंद, आदर्श आणि मिलिंद शिंदे, विठ्ठल उमप, गिन्नी माही यांनी पुढे नेलेल्या भीमगीतांच्या रांगेत आता पुढच्या पिढीतल्या महिलांनी स्वत:चा ठसा उमटवला आहे.
 
भीमगीते म्हटले की, शिंदे घराणे डोळ्यांसमोर येते. मात्र अशाही काही भीमकन्या आहेत, ज्या बौद्ध समाजाला सुरेल वाणीतून बाबासाहेबांचा इतिहास सांगत आहेत. गाणी लिहिण्यापासून ते स्वरबद्ध करून सादर करण्यापर्यंतची सर्व कामे त्याच करतात. त्यांची भीमगीते यूट्यूब आणि इतर समाजमाध्यमांवर लोकांना आपलंसं करत आहेत. त्यांचे हे कार्य अर्थार्जनासाठीही पूरक ठरते आहे. कलेला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने त्यांना व्यासपीठ मिळालंय. या भीमकन्यांचा हा प्रवास...

कोमल हिवाळे
कोमल हिवाळे हिला ‘विद्रोही भीमकन्या’म्हणून ओळखलं जातं. कोमलने १५ गाणी लिहिली. त्यातील दोन रेकॉर्ड झाली आहेत. तिचे ‘भीम वीर तोच खरा जो भीमनामासाठी लढतो’,‘तोच मर्द आहे खरा जो रणमैदानी भिडतो.’ ही दोन गाणी प्रचंड गाजली. कोमलला लिखाण आणि गायनाची आवड बालपणापासून आहे. स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतरही, सर्व सवलती असूनही समाज जेव्हा दिशाहीन होतो, तेव्हा लिखाणातून प्रबोधन करावे, असे वाटले म्हणून या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केल्याचे ती म्हणते. विजयादशमीनंतर तिच्या इतर गाण्यांची रिकॉर्डिंग होणार आहे. कोमलने भीमगीतांबरोबरच अंधश्रद्धेला व पुरुषप्रधान संस्कृतीला बळी पडलेल्या महिलांसाठी ‘जगावं कसं या पाषाण युगात? असं म्हणून चालणार न्हाय.’ हे गीत लिहिले आहे. महिलांनी सक्षम बनून ‘ऐतिहासिक क्रांती’ घडवावी हा यामागचा उद्देश आहे.  भाषणांपेक्षा करमणूक, गीतगायनाच्या माध्यमातून जो प्रहार केला जातो तो यशस्वी होतो. घर, मुलं सांभाळून समाजासाठी जे करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं कोमल म्हणते. 

सरला वानखेडे-तायडे
सरलाचे शिक्षण एमए बीपीएड, बीएडपर्यंत झाले. संगीताची प्रेरणा तिला आईकडून व नंतर अनुराधा कांबळेंकडून मिळाली. समाज प्रबोधनासाठी गायन क्षेत्रात आल्याचं ती म्हणते. कॉलेजपासून तिचा गायनप्रवास सुरू झाला. विविध सरकारी योजना गीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्याचे काम तिने केले. आकाशवाणीवरही गाण्याची संधी तिला मिळाली. त्यानंतर भीमगीते व बुद्धगीतांचा कार्यक्रम सुरू केले. स्वत:चा गीतरंग हा संच तिने उभारलाय. सरलाला नागपूर येथे रमाई पुरस्कार, अकोला येथे वामनदादा कर्डक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  सुरुवातीला मानधनाचा फारसा विचार करत नव्हते. फक्त कार्यक्रम करत राहिले. मात्र आज एक यशस्वी कलाकार म्हणून समाजात ओळख आहे, याचा मला अभिमान वाटतो. लोकांच्या प्रतिक्रिया मिळतात तेव्हा स्फूर्ती व प्रेरणा मिळते, असे ती म्हणते. 

पायल पाईकराव
पायल सध्या मुंबईच्या सर जे. जे. कला महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकते. लिखाण, गायनाबरोबरच पायलला चित्रकारिता आणि फोटोग्राफीची आवड आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ती गाते आहे. तिचा आवाज ऐकून तिच्या शिक्षकांनी, पायलच्या पालकांना संगीत शिकण्यासाठी पाठवण्याचे सुचवले. मात्र परिस्थितीमुळे तिला योग्य वेळी संगीत शिकता आले नाही. दहावी झाल्यानंतर तिने शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. संतोष केचे यांच्याकडून ती संगीत शिकली.‘अंतर तयाच्या जागल्या संवेदना, तीव्र आणि क्रूर त्या जातीयतेच्या भावना, तो जाहला शौर्यप्रतीक केली दूर जनांची वेदना’  ‘भीमराया दिलीस रे मानवतेची भावना‘ तिचे हे गाणे  प्रचंड गाजले. 

स्नेहल कीर्तने
समाजप्रबोधनासाठी गीत गायनाच्या क्षेत्रात आल्याची भावना स्नेहल व्यक्त करते. या क्षेत्रातला आपला आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला झाला असल्याचं ती सांगते. कार्यक्रमानंतर लोक येऊन भेटतात. ज्येष्ठ आशीर्वाद देतात. प्रोत्साहन देतात, तो आनंद, ते समाधान शब्दात व्यक्त नाही करता येणार. माझ्या या कामाला, समाजप्रबोधनाच्या या कार्याला  घरच्यांचं पुर्ण सहकार्य आहे. गायनाची प्रेरणा वडिलांकडून मिळाली. मुळात मला स्वत:लाही गायनाची आवड होती. त्यामुळे पुढे शिकत गेले. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी गातच राहीन, असे स्नेहल म्हणते. बुद्ध आणि भीमागीतांबरोबरच हिंदी, मराठी भावगीते, भक्तिगीत, शिवाजी महाराज जयंती,अहिल्याबाई होळकर जयंतीमध्येही स्नेहल गाते. 
लेखिकेचा संपर्क : ९३४००६१६४६

बातम्या आणखी आहेत...