आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युती केली ती फक्त भगव्यासाठी, जेथे जागा सुटल्या त्या शिवसैनिकांची माफी मागतो; जालन्यात उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृष्णा तिडके

जालना - जालना - देश भगवा केलाच आता महाराष्ट्र भगवा करायचा आहे. त्यामुळे तुझे-माझे करीत खेचत बसणे याला काही अर्थ नाही. भगव्यासाठी युती करायची हा विचार व उद्देशही स्पष्ट आहे. त्यामुळेच सर्व जागांवर लढण्याची तयारी केली असतानाही युती केली. यात काही जागा शिवसेनेकडे आल्या तर काही सोडाव्या लागल्या. मात्र ज्या जागा सोडाव्या लागल्या तेथील शिवसैनिकांची मी माफी मागतो. कारण हा माझा शिवसैनिक आहे, माझ्या सुख-दु:खातील आयुष्यातला सोबती आहे असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी युतीनंतर नाराज झालेल्या शिवसैनिकांची माफी मागत त्यांना भावनिक साद घातली. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ.हिकमत उढाण यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत ठाकरे बोलत होते.


घनसावंगी येथील विजयराजे देशमुख स्टेडियमवर ही प्रचारसभा संपन्न झाली. याप्रसंगी महायुतीचे उमेदवार डॉ.हिकमत उढाण, खासदार संजय जाधव,माजी खासदार हरिभाऊ राठाेड, आमदार विलासराव खरात, सुनिल आर्दड, प्रकाश शेंडगे, रिपाईचे अॅड.ब्रम्हानंद चव्हाण, लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुध्दे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उध्दव ठाकरे व्यासपीठावर येताच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी काठी व घोंगडे देऊन त्यांचे स्वागत केले. या सभेत उध्दव ठाकरे यांनी 20 मिनिटे भाषण केले. सर्व जागा लढवायाच्या अशी सर्वांचीच तयारी होती. परंतु, महाराष्ट्र भगवा करण्यासाठीच आपण युतीचा निर्णय घेतला असे सांगताना पक्षप्रुख ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली.


शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करता, माझे ऐकता,लढ म्हटले तर जिवाची बाजी लावून लढता आणि युती कर म्हटले तर जिवाची बाजी लावून युतीही करतात, असे सोबती कुणाला मिळतील. युती भगव्यासाठीच आहे व महाराष्ट्रासाठी आहे असे सांगत आपण शिवसैनिकांसमोर नतमस्तक होत आहोत असे ठाकरे म्हणाले. यावेळी ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केली. शिवाय सर्व वैद्यकीय चाचण्या एका रुपयात देण्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

शरद पवारांनाही टोला
मी हे सरकार घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे शरद पवार म्हणत आहेत. पवारसाहेब हे सरकार घालवणे तुमच्या हातात राहिले नाही. ही निवडणूक महाराष्ट्रातील जनतेने हातात घेतली आहे. स्वत:च्याच पक्षातील वसंतदादांचे सरकार घालवण्याचा तुमचा जो अनुभव होता तो आता इकडे वापरता येणार नाही. कारण ही मर्दांची औलाद आहे असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी पवारांनाही टोला लगावला.

खाऊन-खाऊन थकले
ग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता थकले आहेत असे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले, मात्र हे तुम्ही सांगायची गरज नाही ते आता दिसतेच आहे. हे दोन्ही पक्ष खाऊन-खाऊन थकले आहेेत आणि आता पुन्हा खाण्यासाठी ते सत्तेत येण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली.

उढाण हे उडाण घेतील
घनसावंगीतील महायुतीचे उमेदवार डॉ.हिकमत उढाण यांचा उल्लेख उध्दव ठाकरे यांनी आमदार असा केला. त्यांना आता महायुतीच्या कार्यकर्त्यांची आणि मतदारसंघातील जनतेचीही साथ आहे. त्यातच यावेळेला विलासराव खरात सोबत असल्यामुळे उढाण आता आमदार होणारच असुन ते घनसावंगीतून विधीमंडळात उडाण घेतील असे उध्दव ठाकरे म्हणाले.

विलासराव खरात यांचे कौतूक

विलासराव खरात हे दोन-तीन वेळा हाताशी येता येता सटकले. त्यात त्यांची चुकी नाही. ते स्वत:हून घरी आले होत. शिवसेनाप्रमुखांना भेटले,मला भेटले. मात्र काही कारणामुळे त्यांना सेनेत घेता आले नाही व उमेदवारीही देता आली नाही. आताही उमेदवारी देऊ शकलो नाही. अशा परिस्थितीत एखाद्याने बंडखोरी केली असती. मात्र विलासराव खरात यांनी तसे काही केले नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, त्यासाठी त्यांना धन्यवाद देतो अशा शब्दात ठाकरे यांनी खरात यांचे कौतूक केले.

पीक विमा कंपन्यांना इशारा


शिवसेना रस्त्यावर उतरल्यामुळेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पीक विम्याचे ११०० कोटी रुपये मिळाले. आता पुन्हा सरकार आल्यावर एकाही पीक विमा कंपनीला सोडणार नाही. शेतकऱ्यांकडून हप्ते घेण्यासाठी या कंपन्यांचे दलाल गावोगावी फिरतात. एकदा हप्ते गोळा केले की ते शोधूनही सापडत नाही. त्यामुळेच जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यालय असेल तरच पीक विमा गोळा करण्याची परवानगी देणार अन्यथा विमा घेऊ देणार नाही असा इशारा  ठाकरे यांनी यावेळी दिला.