आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरे साधणार दुष्काळग्रस्तांशी संवाद; 9 जानेवारीला मराठवाडा भेटीला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतानाच त्यांना मदतीचा हात देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ९ जानेवारी राेजी मराठवाड्याच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. ते औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या भागांची पाहणी करणार आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही १२ जानेवारीपासून दुष्काळी भागाच्या पाहणीस जाणार आहेत. 

 

पंढरपुरात झालेल्या जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली याची माहिती घ्या, सर्वेक्षण करा, असे आदेश शिवसैनिकांना दिले हाेते. जानेवारीत दुष्काळग्रस्त गावांचा दाैरा करणार असल्याचे जाहीर केले हाेते. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्या पार्श्वभूमीवर उद्धव हे ९ जानेवारीपासून दौरा करत आहेत. सरकारने १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून यापैकी ११२ तालुक्यांत गंभीर, तर ३९ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यात यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे मराठवाडा तसेच विदर्भातल्या काही भागांना हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. या दाैऱ्यामध्ये दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत. त्याचप्रमाणे किती जणांना मदत मिळाली, कर्जमाफीच्या घोषणेची किती अंमलबजावणी झाली याची चौकशी करतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

 

मदत माेहीमही राबवणार 
दुष्काळग्रस्त भागाच्या दाैऱ्याबराेबर शिवसेनेतर्फे मदत माेहीमही राबवली जाणार आहे. त्यानुसार १०० ट्रक पशुखाद्य वाटप केले जाईल. यापैकी बीड ३० टन, जालन्यात १० टन खाद्य दिले जाईल. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे १२ जानेवारीपासून दुष्काळग्रस्त गावांचा दाैरा करणार असून या वेळी १५ किलाे तांदूळ, १५ किलाे गहू, साखर, चणाडाळ, प्रत्येकी ५ किलाे कांदे, बटाटे, तेल, १ किलाे चहा पावडर अशा वस्तूंचे वितरणही केले जाईल.