​खोऱ्यात दोन दिवसांपासून मुसळधार; उजनी धरण पूर्ण भरले, १६ दरवाजे उघडले

दिव्य मराठी | Update - Aug 28, 2018, 10:54 AM IST

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण सोमवारी दुपारी १२ वाजता १०० टक्के भरले.

 • Ujani Dam filled up

  टेंभुर्णी- सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण सोमवारी दुपारी १२ वाजता १०० टक्के भरले. रात्री नऊ वाजता १६ दरवाजांतून भीमा नदीत उजनीतून १५ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून उजनी कधी भरणार याकडे सर्वांचा नजरा होत्या. गेल्या वर्षीचा तुलनेत उजनी तीन दिवस आधी १०० टक्के भरले आहे. नीरा खोऱ्यातील देवधर धरणातून १३ हजार ७७६ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. नीरा नृसिंहपूर संगम येथे १७ हजार ४१० तर पंढरपूर येथे १४ हजार ४०० क्युसेक विसर्ग सुरू होता. पुणे जिल्ह्यातील उजनी व भीमा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू असल्याने उजनीच्या वरील धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.


  उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे उजनीतून सोमवारी पहाटेपासून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. पहाटे चार वाजता २ हजार ५०० क्युसेक तर सकाळी नऊ वाजता त्यात वाढ करून पाच हजार क्युसेक करण्यात आली. त्यानंतर दुपारी चार वाजता हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत होते. तर रात्री नऊ वाजता १६ दरवाजे ३० सेंटीमीटर उचलून आणखी पाच हजार क्युसेक असा एकूण १५ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला. वीज निर्मितीसाठी १६०० क्युसेक मिळून एकूण १६ हजार ६०० क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे. यामध्ये मंगळवारी सकाळपर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बंडगार्डन येथून २८ हजार ४५६ क्युसेक तर दौंड येथून एकूण ४० हजार क्युसेक विसर्गाने पाणी येत आहे. सध्या उजनी धरणात ११७.८९ टीएमसी पाणीसाठा असून ५४.२३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. १०१.२२ टक्के उजनी भरले आहे.


  यंदा तीन दिवस अगोदर भरले
  यावर्षी उजनी ८ जुलैपर्यंत वजा १९.८२ टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. ते २० जुलै रोजी मृत साठ्यातून बाहेर आले. १८ अॉगस्ट रोजी ५० टक्के भरले. २७ अॉगस्टला दुपारी १२ वाजता १०० टक्के भरले. उजनी आतापर्यंत ३० वेळा १०० टक्के भरले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उजनी तीन दिवस अगोदर १०० टक्के भरले आहे. ३० अॉगस्ट २०१७ रोजी १०० टक्के भरले होते.


  ११० टक्के भरून घेणार
  वरून येणारा पाण्याचा प्रवाह पाहता समस्या उदभवण्याची शक्यता नाही. सध्या उजनीतून १० हजार क्युसेक विसर्ग सोडला आहे. धरण ११० टक्के भरुन घेणार आहाेत. औज बंधाऱ्यातील प्लेट काढल्या नाहीत. या संदर्भात आमच्याकडे रिपोर्टिंग नाही.
  - धीरज साळे, अधिक्षक अभियंता

Trending