Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Ujani to Solapur New Dual Water line

ठराव : दुहेरीचे काम मनपाकडे, इतिवृत्तात मात्र 'स्मार्ट सिटी'

प्रतिनिधी | Update - Aug 03, 2018, 11:16 AM IST

उजनी ते सोलापूर नवीन दुहेरी जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीऐवजी महापालिकेने करावे, असा ठराव मंगळवारी झालेल

 • Ujani to Solapur New Dual Water line

  सोलापूर- उजनी ते सोलापूर नवीन दुहेरी जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीऐवजी महापालिकेने करावे, असा ठराव मंगळवारी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत पारित केला होता. प्रत्यक्षात इतिवृत्तामध्ये उपसूचनेसह हे काम स्मार्ट सिटी कंपनीकडे सोपवण्यात येत असल्याचा ठराव झाल्याचे निदर्शनास आले आहे. आयुक्तांच्या प्रस्तावावर सभागृहाने विरोधात निर्णय घेतला होता. परंतु पुन्हा दोन दिवसातच इतिवृत्तात मात्र यू टर्न घेतल्याचे समोर आले आहे.


  शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनी घालण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेकडे पाठवला होता. ही योजना स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या वतीने करण्याचा प्रस्ताव होता. याबाबत आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी, विरोधी पक्षनेते महेश कोठे यांना माहितीही दिली होती. मात्र, आयुक्तांनी या योजनेबाबत प्रस्ताव पाठवला. पण, सभागृहात स्मार्ट सिटी कंपनीऐवजी महापालिकाच दुहेरी जलवाहिनीचे काम करण्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे हे काम महापालिका करणार असे सांगण्यात आले. पण आयुक्तांनी आगामी काळातील धोका लक्षात आणून दिल्यानंतर विरोधी पक्षाने उपसूचनेत दुरुस्त करुन स्मार्ट सिटीकडे काम करण्यास संमती दिली. इत्तिवृत्तात उपसूचना दुरुस्तीसह प्रस्ताव मंजूर, असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले. आता हा प्रस्ताव आयुक्तांकडे गेला आहे.


  या कारणाने लटकली असती योजना
  पालिकेकडे यंत्रणा नाही. ७५ कोटी देण्याच्या क्षमतेबाबत शंका आहे. कामास मंजुरी मिळवण्यासाठी लागणारा कालावधी ९० दिवसांचा आहे. मक्तेदारांच्या स्पर्धेमुळे न्यायालयात धाव घेतली जाते. राजकीय हस्तक्षेप वाढल्याने काम करणे अडचणीचे होते. महापालिकेकडे दिलेले अमृत योजना, नगरोत्थान योजना यासह अनेक कामे लटकली आहेत. त्यामुळे दुहेरी जलवाहिनी योजना लटकण्याची शक्यता होती.


  एलईडीचा प्रस्ताव लटकला
  स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरात एलईडी दिवे लावण्याबाबत आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी प्रस्ताव पाठवला आहे. तो प्रस्ताव आॅगस्ट महिन्याच्या नियमित अजेंड्यावर घेतला नाही. शहरात दिवे बंद आहेत. एलईडी बसवण्याचे कारण पुढे करत नवीन दिवे बसवले जात नाही. एलईडीचा प्रस्ताव लटकत पडला आहे. याचा फटका नागरिकांना बसतो. कारण प्रस्ताव आहे म्हणून प्रशासन दिवे बसवत नाही तर प्रस्ताव अजेंड्यावर घेतला जात नाही. याचा त्रास नागरिकांना होतो, असे दिसून येते.


  असा केला बदल....
  दुहेरी जलवाहिनीसाठी एनटीपीसीकडून २५० कोटी, शासनाचे ३०० कोटी, मनपाचे ७५ कोटी घ्यावे. स्मार्ट सिटी कंपनीकडून २०० कोटी रुपये मनपाकडे वर्ग करून घेऊन महापालिकेने काम करावे, अशी उपसूचना होती. त्यात आता बदल करून स्मार्ट सिटी कंपनीकडून काम करून घ्यावे, अशी दुरुस्ती विरोधी पक्षाने केली आहे.


  पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न
  स्मार्ट सिटीचे २०० कोटी मनपाकडे घेऊन काम करावे, अशी उपसूचना होती. स्मार्ट सिटी कंपनी २०० कोटी मनपाकडे देण्याची शक्यता कमी असल्याने आयुक्तांशी चर्चा करून आम्ही सूचनेत बदल केला.
  - महेश कोठे, मनपा विरोधी पक्षनेते


  काम स्मार्ट सिटीकडे
  दुहेरी जलवाहिनीचे काम पालिका नाही तर स्मार्ट सिटी कंपनी करेल. विरोधी पक्षाची उपसूचना दुरुस्त केली. कामाची माहिती सभागृहाकडे सादर करा, असे सूचनेत नमूद आहे.
  - संजय कोळी, मनपा सभागृह नेते

  प्रस्ताव आल्यावर पाहू
  समांतर जलवाहिनीबाबतचा सभागृहातील प्रस्ताव आल्यावर पुढील प्रक्रिया करण्याबाबत निर्णय घेऊ.
  - डाॅ. अविनाश ढाकणे, मनपा आयुक्त

Trending