आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्मिष काढायचं राहिलं...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या माणसाच्या चांगल्या आठवणी पुनःपुन्हा आठवताना आपण आनंदी होत असतो. पण काही आठवणींनी आपले मन दुःखी होते. आपलं काय चुकलं याचा मनात विचार सुरू राहतो. मनातल्या अशाच एका दुखऱ्या कोपऱ्याची ही हुरहूर...

 

माझे वय आणि अनुभवावरून असं लक्षात आलंय की, आयुष्यात आपल्याला हवं ते कधीच मिळत नाही, हे आपण स्वीकारले तर न मिळालेल्या गोष्टीच्या बाबतीत काही काळानं वाईट वाटत नाही. आपल्या माणसाच्या चांगल्या आठवणी पुनःपुन्हा आठवताना आपण आनंदी होतो. पण काही आठवणी आपण मुद्दाम आठवत नाहीत. कारण त्यामुळे मन दुःखी होते. पण मला हळहळ लागून राहिलेली माझ्या वडिलांची आठवण मी सांगू इच्छिते. 
 

 माझे वडील मारुती साधुजी निकाळजे, त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो. घरात सर्वात मोठे म्हणून कुटुंबातल्या बहीण, भावाचे शिक्षण, लग्न ही जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्या वेळी ते शिक्षक होते. त्यांच्या तुटपुंज्या पगारात घरखर्च भागवताना अनेक तडजोडी, त्याग करावा लागला. पण त्यांनी तो कधी बोलून दाखवला नाही. आम्हा भावंडांना उत्तम शिक्षण दिलं. संस्कार दिले. सक्षम जीवन जगण्याच बळ दिलं. आयुष्यात त्यांची स्वत:ची काही तत्त्वं होती. त्या तत्त्वांपासून ते कधीच ढळले नाहीत. तडजोड केली नाही. ते शिस्तप्रिय, कडक स्वभावाचे होते. मोडेन, पण वाकणार नाही हा त्यांचा स्वभाव होता. त्यांचे विचार स्पष्ट आणि परखड असायचे. एखादी गोष्ट, विचार आवडला-पटला नाही, तर ते स्वत:च्या मतांवर ठाम असायचे. माझ्या भावांनी आंतरजातीय विवाह केला तो त्यांना मान्यच नव्हता. वडिलांना खूप समजावून सांगूनही त्यांनी स्वत:चे विचार बदलले नाहीत. आम्ही सर्व जण लग्नाला पाठिंबा देतो आहोत असे समजल्यावर ते मनातून दुखावले होते. त्यांनी तसं व्यक्त केलं नाही तरी ते आम्हाला कळत होतं. त्यांनी हळूहळू सर्वांशी संपर्क कमी केला. बोलणं बंद केलं. एकमेकांसमोर येताच ते मान फिरवून घेत. आपण स्वत:हून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ते जेवढ्यास तेवढं बोलत. घरातल्यांचा एकमेकांशी असलेला दुरावा कमी करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण वडिलांनी स्वत:भोवती कोष तयार केला होता. त्याच्या बाहेर ते पडायला तयार नव्हते. त्यांना आमच्याबद्दल वाटणारं प्रेम, आपुलकी, माया यांचे सर्व कप्पे बंद करून टाकले होते. मला वाईट वाटायचं. पण नाइलाजने शांत राहावं लागायचं. काळ हा दुरावा कमी करेल, असं वाटायचं. कधी वाटायचं, जादूची कांडी फिरावी आणि आमचे परस्परांमधले संबंध पूर्वीसारखे व्हावेत. आम्हाला आमचे पहिले भाऊ मिळावेत. पण काळाच्या पुढे आपले काही चालत नाही. एकेदिवशी झोपेतच त्यांना मृत्यू आला. आज ते आमच्यात नाहीत. ज्या वडिलांनी सांभाळ केला, मोठे केले ते कितीही कठोर असले तरी त्यांनी कर्तव्यात कधीच कसूर केली नाही. पण मी मात्र त्यांच्या मनातलं गैरसमजाचं किल्मिष दूर करू शकले नाही. त्यांचे विचार समजून घेण्यात मी कमी पडले ही खंत कायम माझ्या मनात राहील.

बातम्या आणखी आहेत...