आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना आता नपुंसक केले जाणार; या देशात कायद्याला मिळाली मंजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कीव्ह - भारतात केंद्रीय कॅबिनेटने नुकतेच लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर पोक्सो कायद्याला मंजुरी दिली. त्यामध्ये चिमुकल्यांचे शोषण करणाऱ्यांना कमाल शिक्षा फाशी दिली जाणार आहे. त्यातच युक्रेननेही लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नवीन कायदा केला. त्यामध्ये दोषी सापडणाऱ्यांना बळजबरी केमिकलचे इंजेक्शन देऊन त्यांना आयुष्यभरासाठी नपुंसक केले जाणार आहे. लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षा झाल्यानंतर हजारो कैदी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यापैकीच 18 ते 65 वर्षे वय असलेल्या ठराविक नराधमांना दरवर्षी ही शिक्षा दिली जाणार आहे.


धक्कादायक आकडेवारीनंतर घेतला निर्णय
युक्रेनच्या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार, "सरकारने चिमुकल्यांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध नवीन कायद्याला मंजुरी दिली. त्यामध्ये दोषी सापडलेल्या नराधमांना बळजबरी केमिकलचे इंजेक्शन दिले जाणार आहे. या केमिकलने त्यांच्या शरीरातील काम भावना नाहीशी होईल. ही शिक्षा लहान मुलांवर बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यांनाही लागू केली जाईल." 2017 मध्ये युक्रेनच्या विविध भागांत बलात्काराच्या 320 प्रकरणांची नोंद झाली. तर लहान मुलांवर अत्याचाराच्या घटनांची संख्या हजारोंमध्ये होती.


गेल्या आठवड्यात अवघ्या 24 तासांत चिमुकल्यांवर अत्याचाराच्या 5 घटना समोर आल्या. सरकारी आकडेवारीमध्ये चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटना हजारो असल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ब्रिटिश मीडियाशी संवाद साधताना सांगितले, की प्रत्यक्षात, लहान मुलांवर बलात्काराचे प्रमाण इतके वाढले की आपण केवळ अंदाज लावू शकतो. प्रत्यक्षात घडलेल्या घटनांची आकडेवारी याहून कितीतरी पटीने अधिक असेल. अनेक प्रकरणांमध्ये लहान मुले किंवा मुली भीती आणि माहिती नसल्याने आपल्यावर घडलेल्या अत्याचाराची हकीगत मांडू शकत नाहीत.


ओडेसा प्रांतात नुकतेच एका 11 वर्षीय मुलीवर तिच्याच घरातील ओळखीच्या व्यक्तीने बलात्काराचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता आरोपीने तिची निर्घृण हत्या केली. आरोपीचे वय 22 वर्षे आहे. आरोपीचे नाव समोर येताच शेकडोंच्या संख्येने संतप्त नागरिकांनी त्याच्या घराला घेराव टाकला होता. त्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त लावून आरोपीला अटक करण्यात आली. नवीन कायद्यानुसार, दोष सिद्ध झाल्यास नपुंसक केले जाईल. सोबतच, तुरुंगवासाची शिक्षा 12 वरून 15 वर्षे करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर तुरुंगातून सुटल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीवर आयुष्यभर पोलिस नजर ठेवणार आहेत. युक्रेनमध्ये चिमुकल्यांचे लैंगिक शोषण इतके वाढले होते, की हा कायदा मंजूर करण्यासाठी युक्रेनच्या संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे लागले. सरकारसह विरोधकांनी सुद्धा या नवीन कायद्याचे स्वागत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...