आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला ३१ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम; एमआयएमबाबत चर्चा फक्त ओवेसींशीच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येत्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर जायचे की नाही, त्याचप्रमाणे काँग्रेसला आमच्या अटीशर्ती मान्य आहेत की नाही, हे सारे येत्या ३१ ऑगस्टपर्यंत निश्चित केले जाईल. एमआयएमबरोबरची आमची युती कायम राहील. त्यांच्याबरोबरच्या जागावाटपाची चर्चा फक्त खासदार असुद्दीन ओवेसी यांच्याबरोबरच केली जाईल, असे सांगत एआयएमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मागणीकडे आपण लक्ष देत नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सूचित केले. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सरकार चिदंबरम यांच्यासारख्या विरोधकांनाच ब्लॅकमेलिंग करत नाही तर आता हे लोण पक्षांतर्गत विरोधकांपर्यंतही पोहोचले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतही हे लोण पोहोचण्याची शक्यता आहे, असा दावा ही त्यांनी केला. सध्या राज्य सरकार विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ते  दबावतंत्राचा वापर करत आहे. विरोधकांना संपवण्यासाठी चौकशांचा ससेमिरा लावला जात आहे. त्यामुळे देश व राज्यात आता विरोधक संपल्यात जमा आहेत. हे सरकार संघाचे प्यादे आहे. हे प्यादे कधीही मोडले जाईल, असे ते म्हणाले. 

शिखर बँक प्रकरण २ जी घोटाळ्यासारखे होऊ नये
राज्य सहकारी बँकेचे प्रकरण २ जी घोटाळ्यासारखे होऊ नये, ही अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे त्या प्रकरणात सरकारने पुरावे सादर केले नाहीत आणि न्यायालयात आरोप ठेवलेले सर्व निर्दोष सुटले असे होऊ नये, असेही आंबेडकर म्हणाले. आपल्यालाही ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न झाला होता. नक्षलवाद्यांबरोबर संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला. भाजपच्या दबावतंत्राला मी घाबरत नाही. जनता बरोबर असल्याने ते काही करू शकले नाहीत, असेही ते म्हणाले.

ओबीसींना स्कॉलरशिप
वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यावर ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जाईल व क्रिमिलेयर काढण्यासाठी शासनस्तरावर एक अभ्यास गट नेमला जाईल. या अभ्यासानंतर जो निर्णय येईल त्या पद्धतीने तत्काळ अंमलबजावणी केली जाईल. ज्याप्रमाणे अनुसूचित जाती-जमातींचे वेगळे बजेट आहे तसेच ओबीसींचेही स्वतंत्र बजेट करून त्यांच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, फ्रीशिपही दिली जाईल. बजेटमध्ये तरतूद करताना स्कॉलरशिपसाठी वाढीव महागाई निर्देशांकानुसार ती ठरवण्यात येईल.