आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीची परतफेड...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉस्टेलवरून शिवाजीनगर बस स्टँडला आले. बरीच गर्दी होती कशीबशी जागा मिळाली.पुणे सोडून बराच वेळ झाला आणि कंडक्टर तिकीट देण्यासाठी मागे आले. मी पर्स शोधू लागले आणि पर्स सापडेना. सॅक शोधली, पण व्यर्थ..म्हणजे माझी पर्स पडली किंवा चोरीस गेली असावी.


पण आता तिकीट कसे काढणार?आजूबाजूचे लोक गंमत पाहू लागले. आता कंडक्टर उतरून देणार का? परत होस्टेलवर जायचे म्हटले तर गाडी बरीच पुढे आली होती.


इतक्यात शेजारी बसलेल्या महिलेने माझी चौकशी केली. मी कॉलेजचे नाव सांगून आयकार्ड दाखवले आणि किमान संगमनेरपर्यंतचे तिकीट काढून देण्याची विनंती केली. कारण संगमनेरला माझी आत्या राहते. तिथे पोहोचले तर प्रश्न सुटणार होता आणि त्यांनी माझे तिकीट काढले. मी सुस्कारा सोडला. जवळपास दीडशे रुपये तिकीट होते. त्यांचे नाव हेमलता तारे होते आणि त्या संगमनेरच्या एका कॉलेजात प्राध्यापिका होत्या. नंतर एका ढाब्यावर बस थांबली आणि आम्ही चहा-नाष्टा घेतला. त्याचे पैसे त्यांनीच दिले. संगमनेर आले. आम्ही उतरलो. स्टँडवर आत्या-काका आले होते, कारण त्यांना मी फोन करून सांगितले होते. त्यांनी पैसे परत दिले. त्यांनी फक्त तिकिटाचे पैसे घेतले, चहापाणी माझ्यातर्फे, असे सांगितले. मी तारे मॅडमना विचारले की, कुठलीही ओळख नसताना तुम्ही माझे तिकीट काढले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला याचे कारण काय? तेव्हा त्या म्हणाल्या, विद्यार्थी जेव्हा आमच्याशी बोलतात तेव्हा आम्हाला खरे-खोटे लगेच समजते. तुझ्या बोलण्यात खरेपणा होता म्हणून मी तुझे तिकीट काढले. फक्त इतकेच कर, प्रवासात अशी कोणाला अडचण आली तर शक्य असेल तर मदत कर आणि गाडीत गर्दी असेल तर वृद्ध, अपंग, महिला यांना बसण्यास जागा दे. मी त्यास लगेच मान्यता दिली आणि त्यांना नमस्कार करून धन्यवाद देऊन आत्याच्या घरी निघाले. दुसऱ्या दिवशी मला नाशिकला जायचे होते.

बातम्या आणखी आहेत...