आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न खाल्लेल्या आंब्याची गोष्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळा जसा पोटभर आंबे हादडण्याचा मोसम तसाच आंब्याशी निगडित आठवणींना उजाळा देण्याचाही मोसम. आपल्या वाचकानं पाठवलेली अशीच एक आठवण...­­

 

सात-आठ  वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.  आम्ही सहकुटुंब कोकणच्या सहलीवर निघालो होतो. एकदम सावंतवाडीपर्यंत जायचा विचार होता.निघाल्यापसून सौभाग्यवतींचा सारखा धोशा चालला होता. मला original हापूस खायचाय, हापूस  खायचाय म्हणून. मी तिला म्हणालो बाई, असे सारखे सारखे म्हणू नकोस. आपण उन्हाळ्यातच कोकणात चाललो आहोत, तिथे फक्त दोनच गोष्टी खायच्यात- एक मासे आणि आंबे आणि आपल्याल्या मासे चालत नाहीत, त्यामुळे फक्त आंबेच खावे लागणार.


कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन आम्ही गगनबावड्याच्या अवघड घाटामार्गे थेट देव श्री कुनकेश्वराच्या  मंदिरात दर्शनास पोहोचलो. समोर अत्यंत सुंदर, शांत, नितळ समुद्र किनारा, पाठीशी श्री देव कुनकेश्वराचे भव्य देऊळ. खरंच अगदी देहभान विसरून जायला होते आणि आपण साहजिकच स्वत:ला विसरून जातो. पण गंमत म्हणजे आतापर्यंतच्या आमच्या कोकण प्रवासात आम्हाला कुठेही मनासारखे किंवा कोकणासारखे आंबे मिळाले नाहीत. तेव्हा मन जरा खट्टू झाले होते...म्हणजे आंबा मिळाला, पण कोकणचा राजा नाही. तेव्हा मुक्कामी परत सावंतवाडीस जाऊन परतीच्या प्रवासात आंबे चाखावेत, असा विचार केला आणि कुनकेश्वराच्या देवळाशी जेवण करून मार्गस्थ झालो. आणि तिथेच घात झाला. आम्ही कुनकेश्वराला जे जेवण केले त्याने अथवा तिथल्या पाण्यामुळे सौ.ना विषबाधा झाली. आम्ही जंगलातून जात होतो. दोन्ही बाजूंना फक्त आमराया, मोठमोठी सागाची झाडे, एकाट रस्ता..इकडे परिस्थिती गंभीर होत चालली होती..थांबण्यासारखे एकही ठिकाण दिसत नव्हते. शेवटी आपण सर्व जण जे करतो तेच केले; गजानन महाराजांचा धावा  केला : ‘महाराज वाचवा.’ आणि खरोखरच महाराज हाकेला पावले.


तेवढ्यात आश्चर्य म्हणजे समोर एक factory सारखे बांधकाम दिसले. चालकाला म्हटले, घाल सरळ गाडी आतमध्ये. धावत पळतच मालकाच्या केबिनमध्ये घुसलो आणि त्याना विनंती केली. ती factory एका खरे नामक सद्गृहस्थांची होती. त्यांनी तत्काळ आपल्या गेस्ट हाऊसमध्ये आमची व्यवस्था केली. तोपर्यंत मी आमच्या family doctor ला विचारून जवळील औषध उपचार सुरू केले होते आणि एक माणूस जवळच्या गावाला बाकीची औषधे आणायला पाठवला. त्यांच्या त्या  VIP GUEST HOUSE मध्ये बसून आम्ही थोडा श्वास घेऊन निवांत बसलो. कारण आता परिस्थिती नियंत्रणात होती.


गोष्टीतली खरी गंमत आता सुरू होणार होती. आम्ही गप्पा मारत असतानाच factory मधील काही कर्मचारी आमच्यासाठी ताटेच्या ताटे भरून सुंदर, रसाळ, शुद्ध हापूस आंब्याच्या फोडी घेऊन आले. आता मला त्या factory कडे पाहायला वेळ मिळाला. ती factory हापूस आंब्याच्या प्रक्रियेची  होती. म्हणजे हापूसवर प्रक्रिया करून त्याची १००% निर्यात करणारी होती.


किती  विरोधाभास? ज्या हापूससाठी सौ.नी पूर्ण ट्रिपभर धोशा लावला होता तो ओरिजनल आंबा तर मिळाला, पण ती सोडून सर्वांना... केवढा  दैवदुर्विलास! ह्या परमेश्वराच्या चमत्काराला पाहून आम्ही सर्व चक्रावून गेलो होतो. तेवढ्यात हसत हसत खरे सर बाहेर आले आणि म्हणाले, दोन पेट्या गाडीत ठेवल्या आहेत. त्या फक्त ताईंसाठीच आहेत. कारण त्यांना आता खाता येणार नाहीत, सावकाश घरी जाऊन खा. 


त्यांच्या त्या VIP GUEST HOUSE मधील काम नुकतेच पूर्ण झाले होते. त्यातील जग्वार फिटिंगचे उद्घाटन देखील सौ.च्या हस्ते झाले, ही त्यातली आणखी एक गंमत. असा हा आमचा कोकण दौरा आमच्या कायमचा स्मरणात राहिला.

बातम्या आणखी आहेत...