आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिश्चितताच आधी निश्चित केली...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एफबी, व्हॉट्सअॅप, ट्विटरसारख्या माध्यमांवर बोटं फिरवत टाइमपास करणारी पिढी मागे पडतेय. समाजातले प्रश्न समजून-उमजून ते सोडवण्यासाठी त्यांची धडपड सुरूय. अशाच काही युवकांच्या  ‘सोशल धडपडीच्या’  या कहाण्या...  

 

मी पुण्याजवळच्या अरणगावचा. शाळेसाठीच्या ११ किमीच्या पायपिटीतच शेती, गावाकडचे प्रश्न उमगत गेले. पुण्यात अभियांत्रिकीला मी प्रवेश घेतला. पुण्यात आल्यावर वाचनाची आवड निर्माण झाली. कॉलेजमध्ये सामाजिक उपक्रमात सहभागी व्हायला लागलो. नवनवीन प्रश्न समजू लागले. कधी कधी स्पर्धामय जगण्याचा कंटाळा यायचा, त्रास व्हायचा. समाजातल्या चुकीच्या गोष्टींबद्दल संतापही यायचा. प्रशासकीय सेवा आणि चळवळीतला कार्यकर्ता हे समाजकार्याचे दोनच मार्ग तोवर माहित होते. दोन्ही माझ्या पचनी पडणारे नव्हते. ‘आपल्या शिक्षणाचा समाजासाठी काय उपयोग?’ या प्रशाच्या उत्तरात मी ‘निर्माण’ जवळ थांबलो. 


‘निर्माण’मुळे माझ्या क्षमता, कल, त्यानुषंगाने माझ्या ध्येयाबद्दल स्पष्टता आली. शिक्षणाचा उपयोग समाजातले प्रश्न सोडवण्यासाठी करण्याचा निर्णय पक्का झाला. सामाजिक प्रश्नातली माझ्या भूमिकेवर अभ्यास सुरु झाला. छोट्या छोट्या कृतीपेक्षा एका विषयात खोल जाणे अधिक अर्थपूर्ण वाटलं. फक्त उपक्रम करायच्या मानसिकतेतून (activity based mode) मी प्रश्न मुळापासून सोडवण्याच्या मानसिकतेकडे (problem solving mode) गेलो. ‘डेव्हलपमेंट’ नावच्या नवीन क्षेत्राची ओळख झाली. निर्माणचं पहिलं शिबीर पूर्ण केल्यावर विविध फेलोशिपची माहिती घेतली.निर्माणच्या एका सत्रादरम्यान डॉ. योगेश काळकोंडे म्हणाले होते, “Uncertainty is a hard reality of life & Uncertainty is the only certain thing in the world.” अनिश्चितता हे वास्तव आहे आणि तीच जगातली एकमेव निश्चित गोष्ट आहे. या वाक्याने जरा हादरलोच. यश, अपयश हे परिस्थिती किंवा प्रयत्नावर अवलंबून असतं. प्रयत्न करण्याची भावना जास्त सक्षम करणारी वाटू लागली. या सर्वांचा निर्णयापर्यंत पोहचतानाची भीती कमी होण्यास, निर्णय प्रत्यक्षात आणण्यास मदत झाली.  SBI Youth for India Fellowship द्वारे BAIF Development Research Foundation या सामाजिक संस्थेबरोबर मध्यप्रदेशातल्या बैतुल जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात काम करण्याची संधी मिळाली. बैतुल हा आदिवासी बहुल भाग. गोंड आणि कोरकू आदिवासी समुदायाची वस्ती. येथील मुख्य व्यवसाय पावसावर आधारित शेती. शेतीतून मिळणारे तोकडे उत्पन्न, रोजगाराच्या अपुऱ्या संधी, त्यामुळे होणारे स्थलांतर, आरोग्य अशा समस्या या भागात तीव्र स्वरूपाच्या होत्या. पाण्याची टंचाई. शेती रखरखीत झालेली. जमिनीत मुबलक पाणी. पण त्या पाण्याचा उपसा करण्यासाठी वीजपुरवठा नाही. जो होता त्यासाठी डिझेल इंजिन वापरावं लागे. पण त्याचा खर्च परवडत नव्हता. दळण दळण्यासाठी १७ किमी दूर डोंगरांच्या रस्त्याने जावं लागतं. पीकविमा आजपर्यंत कधीच मिळाला नाही. शेतीसाठी पाणी उपसण्याचा खर्च कमी करण्याच्या हेतूने मी सोलर पंपचा विचार केला. पण तंत्रज्ञान महागडे होते. एका शेतकऱ्याला परवडणार नाही पण समुहाला परवडू शकेल या उद्देशाने सहज वेगवेगळ्या शेतात नेण्याजोगी सोलर पंप यंत्रणा तयार केली. शेतकऱ्यांच्या  गटामध्ये वापरासाठी दिली. या यंत्रणा बनवण्याच्या कामात लोकांचा सहभाग वाढवला. पाच गावामधील गटामध्ये दिलेली ही यंत्रणा पाणी उपसण्यासाठी लागणारा खर्च कमी करणारी ठरली. सोबतच डिझेल इंजिन मधून होणारा कार्बन उत्सर्गही थांबला. पथदिवे आणि घरातील दिवे यासाठी सौर उर्जेच्या साधनाबद्दलची जनजागृतीही घडवून आणली. या भागात स्वयंपाकासाठी लाकडाचा वापर केला जायचा. त्यामुळे महिलांच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा प्रश्न होता. यावर उपाय म्हणून ‘बायफ’ने तयार केलेल्या बायोगॅस (IRESA - Integrated Renewable Energy & Sustainable Agriculture) मॉडेलची अंमलबजावणी सुरु केली. आज अनेक घरी पूर्ण स्वयंपाक बायोगॅसवर होतो.  


हा वर्षभराचा प्रवास माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता. विषयाची व्यापकता समजली. विविध तांत्रिक उपाययोजनांवर काम करण्याची एक जिवंत प्रयोगशाळाच माझ्यासाठी खुली झाली. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो, “It has become appallingly obvious that Technology has exceeded our humanity”, हे आता स्पष्ट झालं आहे की तंत्रज्ञान आज माणुसकी ओलांडून पुढे जात आहे. आज मोठमोठ्या कारमध्येही सुधारणेची गरज आहे आणि शेतकऱ्याकडे असलेल्या बैलगाडीतही. पण यातील बैलगाडीतील सुधारणा मला जास्त गरजेची आणि अर्थपूर्ण वाटते. पुढचं ध्येय ठरलं आहे. पर्यावरणातील बदलाच्या अनुषंगाने पर्यायी ऊर्जासंसाधनांचा शेती आणि जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने उपाययोजना करून ती जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवायची आहे. शेवटी काय, अनिश्चितता हेच वास्तव. वास्तवालाच मला भिडायचंय.

बातम्या आणखी आहेत...