आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मामाने शब्द पाळला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अजून आठवतो मला तो दिवस...! जसे काही हे सगळे काल-परवाच घडले. मी इयत्ता पाचवीची परीक्षा दिली होती. मे 2005 मध्येउन्हाळ्याची सुटी होती. मी माझ्या आजोळी गेले होते. घरी रंग द्यायचे काम चालू होते. घरातले सर्व सामान वाड्याबाहेर काढले होते. खोल्या रिकाम्या करण्यात आल्या होत्या. रंगवाले रंग देत होते.. आणि मी एका रिकाम्या खोलीमध्ये आवाज घुमतो, म्हणून गाणे म्हणत होते. माझे कोणाकडेही लक्ष नव्हते. माझे गाणे म्हणून झाले, मी थांबले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

मी मागे वळून पाहिले तर घरातले सर्वच बाहेर उभे होते. आजोबा माझ्याजवळ आले, त्यांनी मला 101 रुपये काढून हातात दिले. अजून तयारी कर. मग त्यांनी मला त्यांच्या आवडीचे ‘वद जाऊ कुणाला शरण गं’ हे आशा खाडिलकरांचे पद म्हणून दाखवलेस तर तुला 501 रू बक्षीस देईन, असे जाहीर केले. मग मी हे पद कॅसेटमध्ये भरून आणले.. परत परत ऐकले आणि ते पद बसवले. पण आमच्या दुर्दैवाने 13 मार्च 2006 ला आजोबांचे निधन झाले. त्यांना ते पद ऐकवण्याचे राहून गेले; परंतु तेच पद मी दूरदर्शनच्या कार्यक्रमात म्हटले. आईची व माझी त्या कार्यक्रमात ‘आदर्श जोडी’ म्हणून निवड झाली.. मे महिन्यात जेव्हा मी आजोळी गेले तेव्हा मामाने माझ्या हातात 501 रु. देऊन म्हटले. ‘आजोबांचे बक्षीस घे’. आयुष्यात मी खूप काही मिळवीन; पण ह्या बक्षिसाची सर कशालाच येणार नाही. माझ्या मनाला समाधान देणारा हा अनुभव होता. आजोबांनी माझे केलेले कौतूक माझ्या कायम स्मरणात राहील. कारण त्यात मायेचा ओलावा होता. दुधापेक्षा सायीला जास्त जपावे लागते, तसे त्यांनी माझा आजोळी सांभाळही केला होता.