Crime / शेतीच्या जुन्या वादातून काकाने भरचौकात पुतण्याच्या पोटात खंजीर खुपसून केला खून

जिवाला धोका असल्याची तक्रारही केली, पण पोलिसांचे दुर्लक्ष

प्रतिनिधी

Jun 08,2019 11:04:00 AM IST

नांदेड - शेतीच्या जुन्या वादातून उमरी तालुक्यातील गोरठा येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमाराला काकाने सख्ख्या पुतण्याचा खंजीर खुपसून खून केला. भर चौकात दिवसा ढवळ्या ही घटना घडली. या घटनेनंतर तणाव निर्माण होऊन पोलिसांच्या गाडीवर जमावाने दगडफेक केली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर व लाठीमार करावा लागला.


मंगळवारी वादळी वाऱ्यामुळे मृत युवक विश्वंभर भरकड यांच्या शेतातील झाड कोसळले. ते झाड माझे आहे अशी हुज्जत त्याचा काका विश्वंभर भरकड याने घातली. यावरून दोघांत बाचाबाची झाली. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी दोन्ही गटातील लोकांना समज देवून प्रकरण मिटवले. त्यानंतर रामेश्वर शेतात जाण्यासाठी बाहेर निघाले असता, पुंडलिक भरकड, विश्वंभर भरकड, शांताबाई भरकड यांनी “आता तर मिटले, तुला खत्म केल्याशिवाय सोडणार नाही’, अशी धमकी दिली. धमकीला घाबरून रामेश्वर व त्यांच्या आईने शुक्रवारी पोलिस ठाणे गाठून मला व माझ्या परिवाराच्या जीविताला धोका आहे, अशी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. ही तक्रार पोलिस निरीक्षक व पी.एस.ओ. यांनी घेतली नाही.


रामेश्वरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच त्याचे नातलग संतप्त झाले. नातेवाइकांनी एकच आक्रोश करत, माझ्या मुलाच्या मृत्यूला स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जबाबदार आहेत. जो पर्यंत उच्च अधिकारी घटनास्थळी येऊन दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणार नाहीत. तोपर्यंत आम्ही आरोपींना ठेवलेल्या पोलिस गाडीला जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत नातेवाइकांनी पोलिस गाडीवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराच्या तीन नळकांड्या फोडल्या. त्यानंतर जमाव अधिकच संतप्त झाला. त्यांनी पेट्रोल टाकून पोलिस गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भोकर, बिलोली, मुदखेड, धर्मावाद येथील अधिक पोलिस कुमक मागवण्यात आली. ग्रामीण रुग्णालयातही तणाव निर्माण झाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई होईल, असे आश्वासन दिल्यावर जमाव पांगला. मृत रामेश्वरचा भाऊ शंकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी पुंडलिक भरकड, विश्वंभर भरकड, शांताबाई भरकड यांच्या िवरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चौकातच गाठून वार केले
दरम्यान त्यांच्या मागावर असलेल्या या तिघांनी रामेश्वर यांच्यावर खंजीर वार केला. त्यात ते खाली पडले असता, त्यांना वाचवण्यासाठी आई, भाऊ आले असता पुंडलिक भरकड याने भाऊ पांडुरंगवरही खंजीरने वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी अवस्थेत रामेश्वर व पांडुरंग यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता, रामेश्वरला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

X
COMMENT