हॉट सीट / राजकारणात काका-पुतण्यातील सत्तासंघर्ष कायम; आधी पंडित, मुंडे, तर आता क्षीरसागर कुटुंबात दुही

स्व. गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, बदामराव पंडित, विजयसिंह पंडित.  स्व. गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, बदामराव पंडित, विजयसिंह पंडित. 

पेशवाईनंतर बीडमध्ये प्रचिती प्रत्येकच निवडणुकीत असते बीड जिल्ह्याकडे राज्यभराचे लक्ष

Sep 23,2019 05:09:17 PM IST

बीड : काका आणि पुतण्या यांच्यातील राजकारण थेट पेशवाईपासून अनुभवले जाते. यातून बीड जिल्हाही सुटलेला नाही. सुरुवातीला गेवराईत बदामराव पंडित विरुद्ध अमरसिंह पंडित, नंतर परळीत लोकनेते गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे तर आता बीडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर असा सत्तासंघर्ष जिल्हावासीयांना पाहावयास मिळत आहे. त्यामुळेच बीडच्या काका- पुतण्याच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

पेशवाईच्या काळात काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला. 'काका मला वाचवा' म्हणत पळत सुटलेल्या नारायणराव पेशव्याने राघोबा दादाला घातलेली हाक आजही कानाेकानी गुंजत आहे. बीड जिल्ह्याला काका-पुतण्यातील संघर्ष नवा नाही. गेवराईतील राजकारण तर पंडित घराण्याभोवतीच फिरत राहते. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष असलेले बदामराव पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचे पुतणे अमरसिंह पंडित यांचा १८ हजार ६६५ मतांनी पराभव केला होता. पुढे २००४ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढत अमरसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरलेले काका बदामराव पंडित यांचा १६ हजार ६०० मतांनी पराभव केला होता. २००९ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अमरसिंह पंडित तर राष्ट्रवादीकडून बदामराव पंडित निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. २ हजार ३४७ मतांनी पुतणे अमरसिंह यांचा पराभव केला आहे. २०१४ निवडणुकीत दोन्ही काका-पुतणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र होते. अमरसिंह पंडित विधान परिषदेचे आमदार असल्याने त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली नाही. बदामराव पंडित हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढले, परंतु त्यांचा भाजपचे लक्ष्मण पवारांनी पराभव केला. एकंदर विधानसभेच्या निवडणुकीत काकाने पुतण्याचा दोन वेळा तर पुतण्याने काकाचा एक वेळा पराभव केलेला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती झाली तर गेवराईची जागा भाजपला सुटणार आहे. भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे उमेदवार आहेत. परंतु शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही तरीही बदामराव पंडित हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गेवराईत काका बदामराव पंडित विरुद्ध पुतणे विजयसिंह पंडित असा काका-पुतण्याचा सामना होणार आहे.


पालिका निवडणुकीपासून परळीत संघर्ष : परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत ३२ पैकी भाजपचे १७ नगरसेवक निवडून आल्याने बहुमत हाती हाेते. ही पालिका भाजपच्या हाती येईल असे वाटत असतानाच धनंजय मुंडे यांनी भाजपचे ११ नगरसेवक फोडून स्वतंत्र गट स्थापन करत पालिकेवर स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित केले. भाजपच्या हातातून परळी पालिकेची सत्ता निसटली. इथपासूनच पुतणे धनंजय मुंडे व काका गोपीनाथ मुंडे यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. पुढे प्रमोद महाजन यांच्या अकाली निधनानंतर गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत परळीतून धनंजय मुंडे यांच्याएेवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु धनंजय मुंडे यांना विधान परिषदेचे आमदारकी देण्यात आली होती. पंकजा मुंडे परळीतून पहिल्या महिला आमदार झाल्या. विधानसभेला आपल्याला डावललेे गेल्याने धनंजय मुंडे व गोपीनाथ मुंडे यांच्यात राजकीय कलह वाढत गेला. त्यानंतर पुढे २०१४ च्या निवडणुकीत मुंडे बहीण- भावाची कडवी लढत गाजली. यात पंकजा मुंडे विजयी झाल्या.


बीडमध्येही संघर्षाची ठिणगी
बीड पालिकेच्या निवडणुकीत क्षीरसागर काका पुतण्यात सत्ता संघर्ष वाढला होता. रवींद्र क्षीरसागर यांना नगराध्यक्ष करावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतु त्याला सहमती न मिळाल्याने पालिकेच्या निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकू नाना विकास आघाडी स्थापन करत २० नगरसेवक निवडून आणले. राष्ट्रवादीमध्ये आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे पक्षातील नेत्यांकडूनच खच्चीकरण हाेऊन पुतणे संदीप यांना बळ मिळू लागल्याने जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न करता भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचा प्रचार करत निवडून आणले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. आता बीड विधानसभा निवडणुकीत काका-पुतणे आमने सामने येणार आहेत.


काका-पुतण्याच्या लढतीकडे राज्याचे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आरोप केले होते. त्या सर्व आरोपांचे खंडन करत जयदत्त यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत. विधानसभेच्या तोंडावर पुतणे संदीप यांनी नगराध्यक्ष असलेले डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केलेल्या विकास कामावर बॅनरबाजी करून सवाल उपस्थित केले आहेत. संदीप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर काका जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेकडून लढणार असून एकंदर काका-पुतण्यातील चुरशीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

X
स्व. गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, बदामराव पंडित, विजयसिंह पंडित. स्व. गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, बदामराव पंडित, विजयसिंह पंडित.