युवा विश्वचषक / फायनल वाद : बांगलादेश संघाच्या तीन, भारताच्या दाेघांवर डिमेरिट गुणांची कारवाई

भारताच्या आकाशला 8 आणि रवी बिश्नाेईला 7 डिमेरिट गुण

दिव्य मराठी

Feb 12,2020 08:49:00 AM IST

दुबई- आयसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या फायनलमधील गैरवर्तन पाच युवा क्रिकेटपटूंना चांगलेच महागात पडले. यामध्ये भारतीय संघाच्या दाेन आणि विश्वविजेत्या बांगलादेश संघाच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. आयसीसीने आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी भारताच्या आकाश सिंग (८), रवी बिश्नाेई (७), बांगलादेश संघाच्या हिदाॅय, शमीम हुसेन आणि रकीबुल हसनवर डिमेरिट गुणांची कारवाई केली.


युवांच्या विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी पाेचेफस्ट्रमच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात बांगलादेश संघाने डकवर्थ लुईसनुसार भारतावर तीन गड्यांनी मात केली. या सामन्यातील विजयानंतर दाेन्ही संघांतील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. याशिवाय दाेन्ही संघांतील युवा खेळाडू मारहाणीच्या तयारीत हाेते. अखेर मध्यस्थीमुळे हा अनुचित प्रकार टाळला गेला. या प्रकरणानंतर विश्वविजेत्या बांगलादेश संघाचा कर्णधार अकबर अलीने सर्वांची माफी मागितली.


रवी बिश्नाेईला दुसऱ्यांदा डिमेरिट गुण

- भारताच्या आकाश आर्टिकल २.२१ च्या नियमाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्याच्यावर आठ सस्पेन्शन गुणांची कारवाई झाली. हे सहा डिमेरिट पाॅइंटच्या बराेबरीत आहे.


- रवी बिश्नाेईने आर्टिकल २.२१ च्या नियमाचे उल्लंघन केले. त्याला ५ सस्पेन्शन गुण देण्यात आले. त्याने २३ व्या षटकात अविषेकला बाद केल्यानंतर इशारा केला. त्याने आर्टिकल २.५ चे उल्लंघन केले. त्याला दाेन डिमेरिट गुण मिळाले.


- बांगलादेशचा ताैहिद आर्टिकल २.२१ च्या उल्लंघनप्रकरणी दाेषी आढळला आहे. त्याला १० सस्पेन्शन गुण देण्यात आले. हे सहा डिमेरिट गुणांसारखे आहे. तसेच शमीम व रकिबुलने २.२१ चे उल्लंघन केले. त्यामुळे शमीमला आठ आणि रकिबुलला पाच डिमेरिट गुण देण्यात आले.


पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेत पायाच्या नो बॉल तंत्राचा वापर

आयसीसी आता क्रिकेटमध्ये नो बॉलचे नवे तंत्र घेऊन येत आहे. २१ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या महिला टी-२० विश्वचषकात पायाचे नो बॉल तंत्र वापरले जाईल. पहिल्यांदाच अशा प्रकारे आयसीसी स्पर्धेत या तंत्राचा वापर केला जाईल. गेल्या महिन्यात संपलेल्या भारत व वेस्ट इंडीजच्या मालिकेतील यशस्वी आयोजनानंतर विश्वचषकात त्याचा प्रयोग केला जाईल. त्याचप्रमाणे तिसरे पंच प्रत्येक गोलंदाजाच्या पायाच्या नो बॉलवर लक्ष ठेवतील. त्यानंतर नो बॉल असल्यावर ते मैदानावरील पंचांना त्याची माहिती देतील. या नियमानंतर मैदानावरील पंच तिसऱ्या पंचांच्या सल्लाशिवाय नो बॉलवर निर्णय देऊ शकणार नाही. इतर दुसऱ्या प्रकारचे नो बॉल देण्याचा निर्णय मैदानावरील पंच देतील. आयसीसीने म्हटले, “या तंत्राचा वापर १२ सामन्यांत करण्यात आला. ४७१७ चेंडू टाकण्यात आले, ज्यात १३ नो बॉल ठरले. ते सर्व निर्णय अचूक व योग्य ठरले.

X