आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्यातील बारकावे समजून घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करा: जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दंडाधिकारी कामकाज व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी प्रत्येकांनी कायद्यातील बारकावे समजावून घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार वा इतर प्रतिबंधात्मक कारवाई करताना कायद्यातील तरतुदीनुसार अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा पार पडली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी उपस्थित होते. अॅड. संजीवकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. दंडाधिकारी कामकाज व प्रतिबंधात्मक कारवाई करताना येणाऱ्या अडचणी, त्याची अंमलबजावणी कशी करावी, गुन्हा घडण्यापूर्वी पोलिसांनी घ्यावयाची दक्षता याबाबत अॅड. संजीवकुमार पाटील यांनी प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षकांना मार्गदर्शन केले. कायद्याची अंमलबजावणी करताना, तडीपारचे आदेश देताना पोलिस अधिकारी व प्रांताधिकारी यांच्या स्तरावर कोणती काळजी घ्यायची, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


आगामी लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी महसूल व पोलिस विभागाकडून तडीपार व इतर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. रेकॉर्डवरील गुन्हेगार व निवडणुकीत शांतता धोक्यात येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करताना नेमक्या काय तरतुदी आहेत, कोणत्या कलमानुसार कारवाई करावी, कारवाई करताना अडचणी काय आहेत ? याबाबत अॅड. संजीवकुमार पाटील यांनी अचूक मार्गदर्शन केले. सीआरपीसी कायद्यातील कलमानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...