आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात पावसाचे असमान वितरण, ९४ पैकी ४८ दिवस कोरडे, पीक उत्पादनात घट; १२ जिल्हे संकटात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यात पावसाळ्यात जून ते ३ सप्टेंबर या ९४ दिवसांपैकी सरासरी ४८ दिवसांचा खंड पडल्याने खरीप संकटात आला आहे. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतेक भागात १५ ते १७ दिवसांचे दीर्घ खंड पडल्याने पिकांच्या उत्पादनात २५ ते ३० टक्के घट येण्याची शक्यता आहे. या तिन्ही महिन्यांत पावसाचे वितरण असमान राहिल्याने पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. राज्यात १५ ते १८ ऑगस्ट अशी सर्वदूर हजेरी लावून पावसाने आजवर दडी मारली आहे. यामुळे राज्यातील १२ जिल्ह्यांत पावसाची तूट वाढली आहे.  


राज्यात जूनमध्ये वेळेवर दाखल झालेल्या मान्सूनचा त्यानंतरचा प्रवास फारसा दिलासादायक नाही. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात चांगली हजेरी लावलेल्या पावसाने १५ जूननंतर आखडता हात घेत दडी मारली. खरिपासाठी महत्त्वाच्या जुलै महिन्यातही पावसाने राज्यातील बहुतेक भागात १० ते १५ दिवसांची विश्रांती घेतली. ऑगस्टमध्ये १५ ते १८ ऑगस्ट अशी सर्वदूर हजेरी लावलेल्या पावसामुळे खरिपाला जीवदान मिळाले होते. मात्र त्यानंतर गायब झालेला पावसाने ३ सप्टेंबर उजाडला तरी हजेरी लावलेली नाही. यामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन, तूर, मका आदी पिकांचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी घटण्याची शक्यता असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  


कमी पावसाचा पिकांना फटका  
पावसाचा खंड आणि पिकांचे उत्पादन याबाबत औरंगाबादेतील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. एस. बी. पवार यांनी सांगितले...

 

>राज्यात यंदा पावसात मोठे खंड पडले आहेत. मात्र १५ ते १८ ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे खरिपाला जीवदान मिळाले. ज्या ठिकाणी या काळात ४० ते ५० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला तेथे पीक उत्पादनात ३५ ते ४०% घट येण्याची शक्यता आहे. ज्या मंडळात ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी कापूस, सोयाबीन, मका, तूरसह मूग, उडीद पिकांना फटका बसणार आहे.  


> रब्बीची तयारी करा :  डॉ. पवार यांनी सांगितले, ज्या ठिकाणी रान मोकळे आहे, पेरणीच केलेली नाही अशा शेतात १० बाय १० मीटरचे वाफे करावेत, म्हणजे सप्टेंबरमधील पावसाचे पाणी शेतात चांगले मुरेल. २० सप्टेंबरनंतर रब्बी ज्वारी पेरणी करण्यास हरकत नाही.


> या पिकांवर संकट :  मराठवाडा, खान्देश अाणि विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत यंदा पावसाचे असमान िवतरण, कमी काळात जास्त पाऊस, त्यानंतर पावसात खंड असे घडल्याने कापूस, मका, साेयाबीन, तूर, उडीद अाणि मुगाच्या पिकाला फटका बसला अाहे.


ड्राय स्पेल पावसाचे दीर्घ खंड
ज्या काळात दिवसाकाठी २.५ मिमीपेक्षा कमी पाऊस पडतो त्या काळाला ड्राय स्पेल अर्थात पावसातील खंड पडला असे मानले जाते. राज्यात असे प्रमुख खंड  असे : 
- ८ ते २० जून , 
- १ ते ५ जुलै  
- २२ ते ३१ जुलै 
- ६ ते १५ ऑगस्ट 
- १८ ते ३० ऑग. 
- १ ते ३ सप्टेंबर


१२ जिल्ह्यांत कमी पाऊस, ५ जिल्हे दुष्काळसदृश   
ऑगस्टमध्ये पावसात पडलेल्या खंडामुळे राज्यातील १२ जिल्ह्यांत पाऊस अपेक्षित सरासरी गाठू शकलेला नाही.  या १२ पैकी नंदुरबार, सांगली, सोलापूर, बुलडाणा आणि वर्धा या ५ जिल्ह्यांत तर दुष्काळसदृश स्थिती आहे. पावसातील  खंड लांबला तर औरंगाबाद, लातूर, बीड, अमरावती, धुळे, जळगाव या जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती होणार आहे.  
> पावसात १०% पेक्षा कमी तूट पडलेले जिल्हे : िहंगाेली,  उस्मानाबाद, परभणी, भंडारा, यवतमाळ, अहमदनगर, गाेंदिया.
> मराठवाडा विभागात अातापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत पावसात ७%, तर विदर्भात २ % तूट अाहे.

 

जोरदार पावसाची शक्यता कमी  
राज्यात मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती सध्या दिसत नाही. साधारण १२ ते १५ सप्टेंबरपर्यंत राज्यात सर्वत्र हलका पाऊस होत राहील. नंतर परतीच्या मान्सूनमुळे चांगल्या पावसाची शक्यता आहे. पावसातील खंडामुळे हलक्या जमिनी असलेल्या भागातील खरीप पीक उत्पादनात ३० ते ३५% घट येण्याची शक्यता अाहे.
- डॉ. रामचंद्र साबळे, कृषी-हवामानतज्ञ  

बातम्या आणखी आहेत...