विधानसभा 2019 / 'काँग्रेसच्या चुकीचे धोरण आणि भ्रष्ट प्रशासनाने जनता कंगाल', धामणगाव रेल्वेच्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे टिकास्त्र

'देशभरात व महाराष्ट्रात सत्ता असतानाही 15 वर्षांपासून धामणगाव मतदारसंघ वनवास भोगतोय'

प्रतिनिधी

Oct 13,2019 06:35:36 PM IST

धामणगाव रेल्वे- चुकीचे धोरण आणि भ्रष्ट प्रशासनाने जनता कंगाल झाल्याचे टिकास्त्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धामणगाव रेल्वे येथील सभेत काँग्रेसवर सोडले. देश धनवान असला तरी दृष्टीहिन नेतृत्वामुळे जनतेवर ही वेळ आल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारासाठी ते सभेत आज(13 ऑक्टोबर)ला आयोजित सभेत बोलत होते.


काँग्रेसला 70 वर्षे संधी दिल्यानंतरही देशातील गोरगरीब जनतेची, शेतकरी शेतमजुरांची वाईट स्थिती झाली. त्यानंतर सत्ता येऊन केवळ पाच वर्षात जो विकास झाला तो 70 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने किती केला, याचे चिंतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

21 व्या शतकातील सुखी समृद्ध व संपन्न हिंदुस्थान बनवण्यासाठी देशातील व राज्यातील विकासाची प्रक्रिया भाजपने गतिशील केली. 15 वर्षात मागासलेल्या या मतदार संघातील औद्योगिक प्रकल्प, रोजगार व विकासकामांचा बॅकलॉग भरून देऊ याची हमी गडकरी यांनी दिली. देशभरात व महाराष्ट्रात सत्ता असतनाही 15 वर्षांपासून धामणगाव मतदारसंघ वनवास भोगतोय. देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार असल्याने या मतदार संघाचा चौफेर विकास करता येईल, असे ते म्हणाले.

येथे सुरूवातीच्या काळापासूनच अनेक निस्पृह व निस्वार्थी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या संघटनेत काम केले आहे. स्व. दादाराव अडसड यांनी त्या काळी अतिशय प्रतिकूल काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व भारतीय जनता पक्षाचे कार्य केले. तो काळ कठीण होता. सत्ता मिळत नव्हती, विजय दुरापास्त होता. मान, सन्मान, साधन, संपत्ती, प्रतिष्ठाही नव्हती व त्यानंतर काळ बदलला सत्ता व संधी मिळाली. स्व. दादाराव अडसड यांच्यासारख्या निष्ठावान कार्यातून ही संधी मिळाल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. चांदुर रेल्वेत मोठ्या समस्या आहेत, त्या अद्यापही सोडवता आल्या नाहीत. आमदार स्वतःच्या राहत्या गावाचा विकास करू शकत नाही, तर मतदारसंघाचा काय करतील अशी टीका भाजपाचे उमेदवार प्रताप अडसड यांनी बोलताना केली.

X
COMMENT