आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे, मी त्या पक्षाचा अध्यक्ष, रामदास आठवलेंनी मिश्किल शैलीत अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे केले स्वागत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आठवले म्हणाले - ट्रम्प यांच्या दौरा महत्त्वाचा ठरणार, कारण...
  • महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही. त्यामुळे हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही - आठवलेंची टीका

कोल्हापूर - "अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांचे भारतात स्वागत आहे", अशी मिश्किल शैलीत टिप्पणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात पार पडलेल्या एका कार्यक्रमात रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ट्रम्प यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार कारण...


आठवले म्हणाले की, "ट्रम्प यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दौऱ्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त होतील", असा दावा देखील आठवले यांनी यावेळी केला. 
डोनाल्ड ट्रम्प आपल्या कुटुंबासह 24 आणि 25 फेब्रुवारी अशा दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. काल अहमदाबाद विमातळावर ट्रम्प कुटुंबाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पीएम मोदी आणि ट्रम्प यांनी मोठा रोड शो केला. त्यानंतर ते साबरमती आश्रमात गेले आणि नंतर मोटेरा येथील स्टेडियममध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रम पार पडला. 
दरम्यान, राज्यातील सध्याच्या घडामोडींवर रामदास आठवले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही. त्यामुळे हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. तसेच भाजप नेते नारायण राणे यांनी आठ दिवसांत महाविकास आघाडी सरकार कोसळेल असा दावा केला आहे. राणे असे काही म्हणत आहेत म्हणजे तशा काही हालचाली असतील”, असे रामदास आठवले म्हणाले.