Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | United Front of Maratha, Dhangar and Muslims first time in state

मराठा, धनगर व मुस्लिमांचा राज्यात प्रथमच संयुक्त मोर्चा

प्रतिनिधी | Update - Aug 04, 2018, 11:54 AM IST

मराठा, धनगर व मुस्लिम समाजाच्या अारक्षणासाठी तिन्ही समाजांच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर हजारोच्या संख्येने मोर्

 • United Front of Maratha, Dhangar and Muslims first time in state

  नेवासे- मराठा, धनगर व मुस्लिम समाजाच्या अारक्षणासाठी तिन्ही समाजांच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर हजारोच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. राज्यातील या 'क्रांतिकारी" प्रयोगाची नेवासे तालुक्यात सुरुवात झाली आहे. या एकत्रित ताकदीपुढे सरकारला नमावे लागेल, असा इशारा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलताना दिला.


  नेवासे बसस्थानकाजवळच्या ईदगाह मैदानापासून तहसील कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. हजारोंच्या या मोर्चात मराठासह इतर समाजाचे नागरिक सहभागी झाले होते. त्यात वकील, महिला, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होता. मोर्चा तहसीलवर धडकल्यावर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली. तहसीलदार उमेश पाटील यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.


  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तालुक्यातील धनगर व मुस्लिम समाजासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे, असे भाऊसाहेब वाघ यांनी प्रास्ताविकात सांगितले. मराठा अारक्षणासाठी बलिदान देणाऱ्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मोर्चाला हजेरी न लावणारे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा निषेध करण्यात आला.


  शासनावर टीका करताना गडाख म्हणाले, सर्व समाजाला एकत्र करून हा मोर्चा निघाला. मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला सरकारने जाहीरनाम्यात आरक्षण देण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही, याचा आता सगळीकडे उद्रेक झाला आहे. हे सरकार समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम करत आहे. अरक्षणासाठी आता निर्णायक लढा लढावा लागणार आहे .
  राष्ट्रवादीचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी सांगितले, मावळ्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आरक्षण देण्यात टाळाटाळ करणाऱ्या सरकारची पायउतार होण्याची वेळ आली आहे.


  यावेळी अशोक गायकवाड, स्वप्नाक्षा डिके, राणी दरदले, त्रिमूर्ती संस्थेच्या सुमतीताई धाडगे, महंमदभाई आतार, सादिक शिलेदार, धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर, नेवासे वकील संघाचे उपाध्यक्ष गोकुळ भताने, गफूर बागवान, प्रतीक देशमुख, वसंतराव नवले, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष ऋषिराज टकले यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन भाऊसाहेब वाघ यांनी केले. भाजपचे अनिल ताके यांनी आभार मानले.


  शाळा, बससेवा, बाजारपेठ बंद
  छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेल्या भगव्या झेंड्यांसह हिरवे व पिवळे झेंडे मोर्चात दिसत होते. "आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा मोर्चामध्ये देण्यात आल्या. मोर्चा होईपर्यंत सर्व शाळा, बससेवा व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. स्वप्नाक्षा डिके व राणी दरंदले यांची भाषणे तडाखेबाज झाली. गुडगुडीवाले बाबा, करंटा मुख्यमंत्री, गाजर दाखवणारे मुख्यमंत्री यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

Trending