आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफडीआय विरोधात व्यापाऱ्यांची एकजूट; रॅली, रथाद्वारे शासनाच्या धोरणाचा निषेध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- वॉलमार्टसारख्या विदेशी कंपन्या देशी व्यावसायिकांना गिळंकृत करण्यासाठी भारतात येत असून, त्यांना येथे येण्याची परवानगी देऊ नका, लघु व्यावसायिकांना आधार देण्याऐवजी त्यांना उद्ध्वस्त करणारे निर्णय केंद्र शासनाने घेऊ नये यासाठी अकोला जिल्ह्यात शुक्रवारी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांना विविध संघटनांकडून निवेदन देण्यात आले. पंतप्रधानांपर्यंत आमचे म्हणणे पोहोचवा, अशी विनंती प्रशासनाला करण्यात आली. 


घाऊक व्यापार आणि ई-कॉमर्समध्ये विदेशी गुंतवणुकीला परवानगी देऊ नये, सिंगल ब्रँड रिटेलमध्ये १०० टक्के एफडीआयची दिलेली परवानगी रद्द करा, ई-कॉमर्स विषयक धोरण निश्चित करा, जीएसटीमध्ये दोन प्रकारचे दर ठेवावे, जीएसटीमध्ये दहा हजारावर दंड असू नये तसेच शिक्षेची तरतूद रद्द करावी आदी मागण्यांचा प्रामुख्याने निवेदनात समावेश आहे. 


चेंबरचे अध्यक्ष राजकुमार बिलाला, सचिव विवेक डालमिया, श्रीकर सोमण, पुरुषोत्तम राठी, सहसचिव राहुल गोयनका, सराफा असो. चे प्रशांत झांबड यांनी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांना निवेदन दिले. एफडीआयचा फटका कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्सना बसणार आहे, याकडे संघटनेचे अध्यक्ष संजय बाल्टे यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यांच्या नेतृत्वात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. विदेशी गुंतवणुकीत व्यावसायिक भरडणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली. या प्रसंगी संघटनेचे सचिव रमेश कदम, राजू पातुरकर, प्रदीप बियाणी, सुरेश वोरा, अशोक चांडक, अय्याज आमदानी, अनिल तापडिया, नीलेश खत्री, मनीष चांडक, राजू चांडक, मनीष चांडक, केशव पोद्दार, सुनील बाहेती, संजय दोशी, श्याम अग्रवाल, गोपाल अग्रवाल, अजय संघवी आदींचा समावेश होता. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन दिलेे. शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून फेरी काढली. हाती फलक घेऊन त्यांनी शासन धोरणाचा निषेध केला. संघटनेचे अध्यक्ष सुधीर वोरा, सचिव अंजुल जैन, उपाध्यक्ष धर्मेंद्र थोरात उपस्थित होते.


बंदला चांगला प्रतिसाद
व्यापाऱ्यांनी किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणुकीला विरोध केला. या बाबत शासनाचे धोरण चुकीचे असून, त्याचा फेरविचार करावा अशी मागणी केली. बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चेंबरचे अध्यक्ष राजकुमार बिलाला यांनी सांगितले. 


सरकारने व्यापाऱ्यांना गृहीत धरू नये
बी. सी. भरतीया सरकारने व्यापाऱ्यांना गृहीत धरू नये, कारण व्यापार, व्यवसायाच्या विरुद्ध एकजुटीने कुठलाही प्रयत्न हाणून पाडू, असे मत कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी व्यक्त केले. घाऊक व्यापारात विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या शासनाच्या निर्णयाविरुद्ध काढलेला जनजागृती रथ शहरात आला. खंडेलवाल भवनात रथाचे स्वागत केले. त्यानंतर दुचाकी रॅली काढली. व्यापाऱ्यांनी एफडीआय विरुद्ध घोषणा दिल्या. व्यापारी प्रतिनिधी येथे उपस्थित होते. चेंबरच्या कार्यालयात रॅली आली तेथेही स्वागत झाले. व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी रॅलीत सहभागी झाले होते. त्यानंतर अकोटमार्गे रथ मध्यप्रदेशकडे रवाना झाला. 


रुग्णालयातील वैद्यकीय प्रतिष्ठाने सुरू 
सिव्हिल लाईनमधील दत्त मेडिकल बंद दरम्यान सुरू ठेवण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा बाधित होऊ नये म्हणून हे मेडिकल तसेच मोठ्या रुग्णालयातील मेडिकल स्टोअर्स सुरू ठेवण्यात आले होते. तरीही अत्यवस्थ रुग्णांची गैरसोय झाली. शहरातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात भरती रुग्णांना आवश्यक ट्यूब तसेच जरुरी साहित्य बंदमुळे उपलब्ध होण्यात अडचण गेली. संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांनी या बाबत नाराजी व्यक्त केली.

 
पेट्रोलपंप १२ ते ४ वाजेपर्यंत होते बंद 
शहरातील पेट्रोलपंप दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष राहुल राठी यांनी व सहकाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला होता. 


'विदर्भ चेंबर'समोर व्यापारी एकत्र 
विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या श्रावगी टॉवरमधील कार्यालयासमोर व्यापारी शुक्रवारी सकाळी एकत्र आले होते. येथे कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया, माजी अध्यक्ष अशोक गुप्ता, वसंत बाछुका, कमलेश वोरा, विजयकुमार पनपालिया, अतुल संघवी यांच्यासह चेंबरचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. 

बातम्या आणखी आहेत...