Political / लोकशाहीवृद्धीसाठी काका-पुतण्याचे एकमत महत्त्वाचे, मंत्री मुनगंटीवारांचा शरद पवार अजितदादांना टोला

मित्रपक्षाचेही उमेदवार निवडून आणा अमित शहांचा आदेश
 

प्रतिनिधी

Jun 11,2019 07:16:00 AM IST

नाशिक - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा, तर त्यांचे पुतणे अजित पवार जेथे आपले उमेदवार निवडून आले तेथेही ईव्हीएमच असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना विधानसभेच्या कामाला लागण्याचा सल्ला देतात. यातून एकाच पक्षातील दोन बड्या नेत्यांमध्ये मतदान यंत्रांबाबत मतभिन्नता स्पष्ट होत आहे. काका-पुतण्याचे एखाद्या विषयावर तरी एकमत व्हावे, ते लोकशाहीवृद्धीसाठी महत्त्वाचे असल्याचा टोला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.


नाशिक येथे वन विभागाची आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने त्यांनी पक्षाला शुभेच्छा दिल्या. काँग्रेसच्या माध्यमातूनही तेच सत्तेत होते. आता आमच्यावर जनतेने विश्वास ठेवला आहे. त्यामुळे उगाच ईव्हीएममधील घोळाचे खूळ त्यांनी काढू नये. प्रथम पवार काका-पुतण्यांनी एखाद्या विषायावर आपले एकमत करावे, असाच सल्ला मुनगंटीवार यांनी दिला. पुढील २५ वर्षे आमच्या विरोधाच्या माध्यमातून टीका करण्याची संधी मिळणार असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.


मित्रपक्षाचेही उमेदवार निवडून आणा
‘अबकी बार २२० पार’ असा नारा आम्ही दिला आहे. शिवसेना, रिपाइं अन् महादेव जानकारांचा पक्ष अशा सर्वांचेच उमेदवार निवडून आणावेत, असे आदेश पक्षाध्यक्ष शहा यांनी दिल्याचे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच व्हावा, असे आदेश शहांनी दिल्याने तूर्तास शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळते की नाही याबाबत संभ्रमावस्था आहे.

X
COMMENT