आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या आझाद चौक परिसरात मॉब लिन्चिंगचा प्रयत्न, झोमॅटोच्या दोन डिलिव्हरी बॉयना ‘जय श्रीराम म्हणा’ म्हणत बेदम मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रविवारी रात्री झोमॅटोच्या दोन डिलिव्हरी बॉयना चारचाकीतून आलेल्या अज्ञात लोकांनी “जय श्रीराम म्हणा’ म्हणत बेदम मारहाण केली. हा प्रकार रात्री बाराच्या सुमारास बजरंग चौक भागात घडला. मारहाण करणारे लगेच पळून गेले. मात्र, या घटनेनंतर आझाद चौक परिसरात प्रचंड तणाव पसरला. मोठा जमाव रस्त्यावर आला. यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा मोठा फौजफाटा आझाद चौक परिसरात तैनात होता.


शेख आमिर आणि शेख नासीर अशी मारहाण झालेल्या युवकांची नावे आहेत. या घटनेबाबत समजताच पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्यासह ८ पोलिस निरीक्षक व इतर जवान आझाद चौकात आले. संतप्त जमावाला आवरण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तत्पूर्वी जमावाने सौम्य दगडफेकही केली. दरम्यान, आरोपींचा शोध सुरू असून त्यांना तत्काळ अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी जमावाला दिले. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सिडको पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, तीन दिवसांत अशा प्रकारची घडलेली शहरातील ही दुसरी घटना आहे. 


दोन वाहने जाळली : दरम्यान, क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंजारा कॉलनीलगत अज्ञात लोकांनी दोन वाहने जाळली. या भागातही गस्त वाढवण्यात आली होती. 
 

अफवांवर विश्वास ठेवू नका
या घटनेबाबत तक्रार आली असून आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांना तत्काळ अटक केली जाईल. लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता पाळावी.
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त