आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांना मारण्यासाठी चार गावांना पाणी पुरवणाऱ्या विहिरीत मिसळले जहाल विष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - लांबवलेल्या पावसामुळे गडद होत असलेले दुष्काळाचे संकट आणि त्यात जाणवणारी तीव्र पाणीटंचाई यामुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. अशातच अज्ञात समाजकंटक चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाण्यात विष कालवून ग्रामस्थांच्या जिवावर उठला. पाण्याचा रंग बदलल्याने वेळीच ही बाब लक्षात आल्याने हजाराे लाेकांचा जीव वाचला. ही घटना गेवराई तालुक्यातील भोजगावात उघडकीस अाली. अज्ञात व्यक्तीने कीटकनाशकाच्या दोन बाटल्या पाण्यात ओतल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आला.  गेवराई पोलिसांनी या गावाला भेट देऊन पंचनामा करून कीटकनाशकच्या दोन्ही बाटल्या जप्त करून विहिरीतील पाण्याचे नमुने घेतले आहेत. या विहिरीतील विषाक्त पाणी उपसले जात आहे. 


गेवराई तालुक्यातील भोजगावची लोकसंख्या दीड हजार असून  गावात सार्वजनिक विहिरीतून पंधरा मिनिटे  ग्रामस्थांना पाणी मिळते. परंतु ते  पुरेसे नाही. गावातील शेतकरी रावसाहेब शिंदे यांनी गावापासून दीड किमी अंतरावर आठ वर्षापूर्वी ९ परस विहिर खोदून पाच एकर उसाची लागवड केली हाेती. परंतु पाऊस नसल्याने गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली.  ही टंचाई ओळखून त्यांनी आपल्या  शेतातील उसाच्या पिकाचा विचार न करता तसेच दररोज विहिरीत एक परस पाणी येत असल्याने अल्पदरात दोन टँकरने गेवराई तालुक्यातील भोजगावसह कोमलवाडी, राजपिंपरी, भाट आंतरवाली या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला हाेता. भोजगावमध्ये विहिरीवर मात्र नागरिकांना मोफत पाणीपुरवठा  करण्यात येतो.  


अंधाराचा फायदा :  बुधवार १७ जुलै रोजी रात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येथील विहिरीच्या पाण्यात फिनाॅलफाॅस या कीटकनाशकाच्या दाेन बाटल्या कालवल्या. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी  रावसाहेब शिंदे यांनी गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  या विहिरीतील पाणी  ग्रामस्थांच्या पिण्यात आले नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस जमादार सतीश खरात हे करत आहेत. 
 

पाण्याचे नमुनेही घेतले 
गुरुवारी सकाळी सहा वाजता शेतकरी रावसाहेब शिंदे हे नेहमीप्रमाणे विहिरीवर वीज मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. तेव्हा पाणी भरण्यासाठी   विहिरीवर नागरिक सायकल, दुचाकीवर कॅन लावून आले होते. विहिरीवर आलेल्या ग्रामस्थांना कीटकनाशकाचा तीव्र दर्प अाला.  विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना अर्धा लिटरच्या फिनाॅलफाॅस कीटकनाशकच्या  दोन बाटल्या दिसून आल्या.  भोजगाव येथे भेट दिलेल्या पोलिसांनी पंचनामा करून कीटकनाशकाच्या  बाटल्या  जप्त केल्या असून विहिरीतील पाण्याचे नमुनेही घेतले आहेत. 

 

विहिरीतील पाणी उपसले 
विहिरीतील विषारी पाणी सध्या उपसले जात असून हे संपूर्ण पाणी उपसल्यानंतर सदरील विहिर धुतली जाणार आहे. चांगल्या पाण्याची खात्री केल्यांनतरच सदरील पाणी ग्रामस्थांसाठी सोडले जाणार आहे.
-रावसाहेब शिंदे, शेतकरी भोजगाव.

 

आरोपीस लवकरच पकडू 
पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील कीटकनाशकाच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या अाहेत.  पाण्याचे नमुनेही घेण्यात आले आहेत. हे  नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात येणार असून आरोपीस लवकरच अटक करू, असे  पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...