आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया पायवाटेवर संघर्षाविना आपण निसर्गात सामावून जातो. इथे निसर्गाशी एकरूप होणे हे निरागस होणे असते. जगातले व्याप-ताप काही काळापुरते विलग होतात. आपण स्वत:चा शोध घेऊ लागतो. अापल्या असण्या-नसण्याचा, नात्याचा, देव-धर्म-समाज आदींचा नव्याने अर्थ लावू पाहतो. थोडक्यात, ही यात्रा आपल्याला आत्मशोधाच्या मार्गावर घेऊन जाते. तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे आपलाच आपल्याशी वाद-संवाद घडून येतो. आसपासच्या जगाचे आपले भान विस्तारते...अशा या कैलास मानसरोवर यात्रेवर ‘दी कैलास’ नावाचे देखणे छायाचित्रांचे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या यात्रिकाचे हे मनोगत...
कैलास मानसरोवर यात्रा माझ्या मनात किशोरवयापासून घर करून होती. १९८२मध्ये भारत सरकारने चीन सरकारशी चर्चा करून ही यात्रा सुरू केली. ते कुठं तरी वाचलं होतं, तेव्हापासून मनात यात्रेबद्दल आकर्षण आणि कुतूहल होतं. पुढं अनेक ट्रेक केले, पण कैलास कायम खुणावत राहिला. मग अचानक भारत सरकारच्या वतीनं २०१७ जुलैला यात्रेकरूंच्या एका तुकडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली अन् माझी अनेक वर्षांची इच्छा पूर्ण करायची संधी मिळाली.
हिमालय पार करून तिबेटन पठारापर्यंतची पायपीट ही ट्रेकर्ससाठी अवर्णनीय पर्वणी आहे. ट्रेकच्या बरोबरीनं त्याचं अध्यात्मच्या दृष्टीनं एक वेगळं महत्त्व आहे. धार्मिक तर आहेच. हिंदू, बौद्ध, जैन व स्थानिक तिबेटियन सगळ्यांच्या धार्मिक भावना कैलाशशी निगडित आहेत. ब्रह्मदेवाच्या मनात निर्मिती झाल्यावर भूतलावर अवतरलं म्हणून मानसरोवर! तसेच साक्षात महादेवाचा वास असलेला कैलास! यामुळं हिंदू धर्मात या यात्रेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
नारायण आश्रमापासून ही मानसरोवर यात्रा सुरू होते. सिरखा, गाला, बुंदी, गुंजी व नाविढांग अशा पाडावांनंतर लिपुलेख खिंडीतून कैलास यात्रेचा मार्ग तिबेटमध्ये जातो. या संपूर्ण प्रवासात भारत-नेपाळची सीमा असलेली काली नदी सोबत असते. या नदीच्या किनाऱ्याहूनच हा रस्ता आहे. सुरुवातीला घनदाट असलेलं जंगल शेवटी शेवटी विरळ होत जातं. लिपुलेख खिंडीपाशी मात्र संपूर्ण ओसाड असा प्रदेश दिसतो. हा प्रदेश ओसाड असला तरी या ओसाडपणातही आगळं सौंदर्य दडलेलं आहे. ते डोळ्यांत साठवायला हवं. प्रत्यक्षात अनुभवायला हवं.
तिबेटमध्ये यमद्वारपासून कैलास परिक्रमा सुरू होते. महाभारतातल्या कथेनुसार फक्त युधिष्ठीर व त्याचा श्वान हे फक्त इथपर्यंत पोहोचले होते. बाकी पांडव व द्रौपदी वाटेतच मरण पावले. द्वापारकाळातल्या युधिष्ठिराच्या बरोबरीने कलियुगात, आम्ही पण तेथपर्यंत पोहोचलो, या कल्पनेने उगाच आम्ही सुखावलो. यानंतर या ५२ किमीच्या तीन दिवसांच्या परिक्रमेत कैलास सतत सोबत होता अन् मनात सुरुवातीची चलबिचल थांबून त्याची जागा कमालीच्या शांततेने घेतली होती. या शांततेनं बोलघेवड्या मंडळींवरही जादू केली होती. सारेच नि:शब्द झाले होते. शांततेतला निसर्गाचा तेवढा गुंजारव अनुुभवत होते. अन् जेव्हा दारफूखला कैलाशचे जवळून दर्शन झाले तेव्हा सगळ्यांचेच देहभान हरपून गेले. नंतरचे काही तास वेगळ्याच अनुभूतीने मनास वेढले. मनात विचार आला, याच अवस्थेला झपुर्झा तर नाही म्हणत!
संपूर्ण परिक्रमेत शारीरिक श्रम प्रचंड होते, पण मन मात्र उल्हसित होतं. परिक्रमा संपून शेवटचा पडाव मानसरोवरला होता. भारतीय उपखंडातल्या सर्व नद्यांचा मूळ स्रोत असलेला हा आद्य तलाव. शांत, अथांग अन् गहिरा. याच्या किनाऱ्यावर बसून याला न्याहाळण्यात वेगळीच मजा आहे.
कैलाश व मानसरोवरला गेल्यानंतर पुराणातल्या कथा, दंतकथा यांच्या प्रभावातून बऱ्याच लोकांना चमत्कारिक गोष्टींचा भास होतो. मध्यरात्री मानसरोवरात देव स्नानाला येतात, हा त्यातून अालेला अंधविश्वास. पण, पूर्ण रात्र जागूनही सोबतच्या काही यात्रेकरूंना देवदर्शन झाले नाही, म्हणून त्यांचा हिरमोड झाला. मात्र, देवदर्शन इतके सहज नाही, याची प्रचिती मात्र या प्रसंगाने सर्वांनाच झाली. यानंतर परतीचा प्रवास सुरू होतो. परत तीन दिवसांच्या ट्रेकने ही यात्रा संपते.
मानसरोवर यात्रा ही आपली आपल्याशी जोडण्याची यात्रा आहे. निसर्ग हे स्वतःचा स्वतःशी संवाद करून देणारं माध्यम आहे. तुकारामाने वर्णिलेली ‘आपुलाच वाद आपणासी’ ही अवस्था अनुभवण्यासाठी ही यात्रा आवश्यक आहे. अर्थात, या यात्रेचा अनुभव कथन करणे अवघड आहे. कबीराच्या दोह्यात सांगायचं, तर
अकथ कहानी प्रेम की, कुछ कही न जाए ।
गुंगे केरी सरकारा, बैठे मुस्काए ।।
थोडक्यात, मुक्या माणसाला साखरेचा स्वाद विचारला, तो फक्त ती चव आठवून हसेल. मात्र, त्याबद्दल काही बोलू नाही शकणार. मला कुणी या यात्रेबद्दल विचारलं तर माझी परिस्थिती पण कबीराने सांगितलेल्या माणसासारखीच आहे...
unmeshwagh@yahoo.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.