आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन डीजेचालकांना चाबकाचे फटके देत अनैसर्गिक अत्याचार, नाशकात फार्म हाऊसवर गुन्हेगाराच्या वाढदिवसाची घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : माताेरीतील निर्जन 'शिवगंगा' फार्म हाउसवर कुख्यात गुन्हेगाराच्या वाढदिवसासाठी गुरुवारी पहाटेपर्यंत डीजे वाजवण्याच्या सक्तीला विरोध करणाऱ्या दाेघा डीजेचालकांना अमानूष मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या १५ जणांच्या टोळक्यापैकी सहा नराधमांना पोलिसांनी ४८ तासांनंतर अटक केली आहे.

आम्ही भाजपच्या एका आमदाराचे कार्यकर्ते असून पाेलिस आयुक्त वा अधीक्षक हे हात लाऊ शकत नाहीत, अशीही दमबाजी या नराधमांनी केल्याची कैफियत पीडितांनी उघडपणे मांडली आहे. आडनाव विचारून पीडितांना मारहाण केल्याने या घटनेचे सामाजिक पडसादही उमटत असून आता राजकीय व पाेलिस वर्तुळातील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

या प्रकरणानंतर धास्तावलेल्या युवकांना प्रचंड दमबाजीही झाल्याचे वृत्त आहे. एका आमदार महिलेने या प्रकरणात माेठी भूमिका बजावल्यामुळे पाेलिस यंत्रणेवर दबाव आल्याचे सांगितले जाते. शुक्रवारचा संपूर्ण दिवस माैन बाळगल्यानंतर शनिवारी दाेन्ही पीडितांनी नाशिक तालुका पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखवल्यावर मग पुढे चक्रे फिरली. पाेलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच पीडित तरुणांनी प्रसारमाध्यमांकडे सांगितलेल्या आपबितीनुसार, गुरुवारी माताेरी येथील कांतिलाल पवार यांच्या 'शिवगंगा' फार्मवर कुख्यात गुन्हेगार संदेश काजळे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निखिल पवार याने पार्टीचे नियाेजन केले हाेते. त्यासाठी सिंगल बँडचा डीजे चालवण्यासाठी आनंद चित्रकते यांना ऑर्डर दिली हाेती. त्यांच्यासमवेत विनय पगारे (रा. अाेझर) व प्रथमेश खामकर (कर्णनगर) हे देखील गेले हाेते. रात्री साडेआठला मित्र जमू लागल्यानंतर काजळे हा साडेनऊ वाजता आला. त्यानंतर ३० ते ४० जणांच्या उपस्थितीत रात्री साडेदहा वाजता काजळेने केक कापल्यानंतर पुन्हा पार्टी रंगू लागली. मद्याच्या नशेत बेधुंद हाेऊन सारेच नाचत असताना रात्रीचे बारा वाजल्यामुळे आम्ही डीजे बंद करताेय असे सांगितल्यावर पार्टीतील मित्रांनी धमकावण्यास सुरुवात केली. संदेश काजळे सांगेल ताेपर्यंत वाजवत रहा असे सांगितल्यावर हे सत्र रात्री तीन वाजेपर्यंत सुरू राहिले. त्यानंतर मुख्य डीजेचालक आनंद चित्रकते यास संदेश याने हाकलून देत स्वत:च्या माेबाइलवरील गाणे डीजेला कनेक्ट करून वाजवणे सुरू केले. त्यात व्यत्यय येत असल्यामुळे डीजे खराब आहे, असे सांगत संदेश याने तक्रारीचा सूर व्यक्त केल्यानंतर हा जास्त बाेलताे म्हणून संदेशचा भाऊ प्रीतेश याने खामकर याच्या चापट मारली. त्यानंतर धक्कादायक घटनेचा पहिला अंक सुरू झाला. संदेश, प्रीतेश, सिद्धेश (रा. खैरे गल्ली), साेनू व सँडी रिक्षावाला (रा. माेरवाडी) यांच्यासह काही युवकांनी बेदम मारहाण सुरू केली. यात पगारे यास जातीयवादी शिवीगाळ करून अधिकच मारहाण केली. आळीपाळीने मारहाण केल्यानंतर संदेश काजळे याने हवेत गाेळीबार तर केलाच. मात्र, हातातील बॅटरीसारख्या यंत्रातून वीजेचे चटकेही दिले. सिगारेटनेही अंगाला चटके दिले जात हाेते. त्यानंतर काेणी अंगावर लघवी केली तर काहींनी पेट्राेलसारखे द्रव्यही टाकण्याचा प्रयत्न केला. मध्येच दारू पाजली जात हाेती. त्यानंतर किळसवाणे लैंगिक अत्याचार सुरू झाले. हे सत्र संदेश काजळे यास सकाळी झाेप लागेपर्यंत सुरू हाेते. त्यानंतर त्याच्याच काही मित्रांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या दाेन युवकांना पळवून लावले. नजीकच्या एका चहाच्या टपरीवर जाऊन त्यांनी मुख्य डीजेचालक करण शिंदे यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली.

या प्रकरणात एका पीडिताचे आडनाव ऐकल्यानंतर जातिवाचक शिवीगाळ करून तीव्र अत्याचार झाल्याची कैफियत संबंधितांनी मांडल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

काजळेची आमदार 'आत्या' काेण?

काजळे हा गुन्हेगार असून ताे कथित आमदार आत्याच्या जीवावर दहशत माजवत असल्याची चर्चा आहे. ही आत्या व मामा त्यास नेहमी वाचवतात, असे या परिसरामध्ये सांगितले जाते. या प्रकरणातील पीडितांनीही तसा आराेप भाजप आमदाराचे नाव घेत केला आहे. भाजप नगरसेवकाला अनधिकृत इमारतीशी संबंधित जाब विचारल्याने काजळे याने धमकावल्याची मध्यंतरी चर्चा हाेती. मात्र, हे प्रकरणही या आत्याच्या दबावामुळे दाबल्याची चर्चा नाशिकसह परिसरामध्ये सुरू आहे.

एकही दोषी सुटणार नाही

फार्म हाउसमधील प्रकार गंभीर आहे. संशयितांच्या विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, अॅट्राॅसिटी, अनैसर्गिक अत्याचार, राइट आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फार्म हाउसचालक निखिल पवार याच्यासह सहा संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणातील एकही दोषी सुटणार नाही. - डाॅ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक, ग्रामीण

सहा संशयित अटकेत

या प्रकरणात फार्म हाउसचा मालक निखिल राजेंद्र पवार, प्रीतेश काजळे, संदेश दिलीप वाघ, ज्ञानेश्वर शिरसाठ, रोहित जगदीश डोळस, संदीप अजबराव भाळवकर यांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे के. के. पाटील, तालुका पोलिस ठाण्याचे विष्णू आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा उपविभागीय अधिकारी अरुंधती राणे पुढील तपास करत आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...