Delhi / उन्नाव प्रकरण : दर महिन्याला ५ हजार पत्रे, ८ टप्प्यांमधून गेल्यानंतर सरन्यायाधीशांपर्यंत पोहोचते पत्र

अखेर उन्नावमधील अत्याचार पीडितेचे पत्र कोणत्या प्रक्रियेमध्ये अडकले?

दिव्य मराठी

Aug 04,2019 07:25:00 AM IST

नवी दिल्ली - उन्नावची अत्याचार पीडिता जीवन-मृत्यूचा संघर्ष करत आहे. पीडितेने आरोपी कुलदीप सेंगरकडून मिळत असलेल्या धमक्यांदरम्यान सरन्यायाधीश (सीजेआय) रंजन गोगोईंना १२ जुलैला पत्र लिहिले होेते. पत्र त्यांना मिळण्याआधीच पीडितेच्या कारला ट्रकने धडक दिली. अखेर पीडितेचे पत्र गोगोईंना का मिळाले नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाला दर महिन्यात सरासरी पाच हजार पत्रे मिळतात. जुलैत तर ६९०० पत्रे मिळाली. गोगोईंनी पत्र का मिळाले नाही याचे कारण विचारले असता सेक्रेटरी जनरल यांनी सांगितले की, पीडितेच्या आईचे पत्र सीजेआयपर्यंत पोहोचवण्यात मुद्दाम उशीर झालेला नाही. पीडिता किंवा तिच्या आईचे नाव माहीत नव्हते, त्यामुळे पत्र आल्याचे कळलेच नाही.

सीजेआयपर्यंत पत्र पोहोचण्याचे आठ टप्पे

1.सर्वात आधी पत्र सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्री विभागात येते. प्रत्येक पत्राची नोंद होते.
2. सर्व पत्रे रिसीट अँड इश्यू सेक्शनमध्ये पाठवतात. तेथे पत्रे वाचून त्यांचे वर्गीकरण होते. तेथे जजच्या विरोधात, वकिलांच्या विरोधात व इतर प्रकरणांशी संबंधित पत्रे वेगळी केली जातात.
3. आता वेळ येते विशेष समितीची. समिती पत्रे वेगवेगळ्या समित्यांना पाठवते. उदा. जजच्या विरोधात तक्रार असेल तर त्यासाठी स्थापन विशेष कमिटीकडे ते पाठवले जाते.
4. सीलबंद पत्रे उघडून पर्सनल सेक्रेटरी तपासतात आणि प्राधान्याच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करतात.
5. गंभीर प्रकरणांशी संबंधित पत्रे रजिस्ट्रार जनरलकडे पाठवतात.
6. रजिस्ट्रार जनरल मिळालेल्या सर्व पत्रांबाबत एक संक्षिप्त नोट तयार करतात.
7. रजिस्ट्रार जनरल महत्त्वाची प्रकरणे सरन्यायाधीशांच्या खासगी सचिवांकडे पाठवतात.
8. खासगी सचिव महत्त्वाची पत्रे सीजेआयना दाखवून त्यांच्याकडून निर्देश घेतात.

X