• Home
  • National
  • Unnawan torture Case: pressure is on to withdraw cases, victims and mothers send letters to the chief justice

भास्कर ग्राउंड रिपोर्ट / उन्नाव अत्याचार प्रकरण : आम्हाला धमक्या मिळू लागल्यात, हत्याही होऊ शकते, केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातोय, पीडिता व आईने सरन्यायाधीशांना पत्र पाठवले होते

खोट्या खटल्यात कुटुंबाला अडकवण्याची धमकी दिली, पत्रात दावा 
 

दिव्य मराठी

Jul 31,2019 09:50:00 AM IST

लखनऊ - लखनऊचे किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज (केजीएमयू) ट्रॉमा सेंटरमध्ये जीवन व मृत्यूशी झुंज देणाऱ्या उन्नाव जिल्ह्यातील अत्याचार पीडितेचे एक पत्र जाहीर झाले आहे. हे पत्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पाठवले होते. त्यात पीडिता व तिच्या आईने आमदार कुलदीप सेंगरकडून धमक्या दिल्या जात असल्याचे नमूद केले होते.


मंगळवारी सकाळी पीडितेच्या कुटुंबाने किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज (केजीएमयू) ट्रॉमा सेंटरच्या बाहेर धरणे धरले. पीडितेचे काका महेशसिंह यांची सुटका करण्याची त्यांनी मागणी केली. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून महेशसिंह रायबरेलीच्या तुरुंगात आहेत. कुटुंबाच्या आंदोलनाची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पीडितेच्या नातेवाइकांची भेट घेतली. त्यानंतर धरणे मागे घेण्यात आले. सपाकडून पीडितेच्या नाते‌वाइकांना १६ लाख रुपयांची मदत देण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्याशी केलेल्याच चर्चेत कुटुंबीयांनी आमच्या काकांची सुटका होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असा पवित्रा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्कारासाठी काका महेश यांची एक दिवसाच्या पॅरोलवर सुटका केली जाईल, असे सांगितले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ पीठाने महेशसिंह यांच्या पत्नीला अंत्यसंस्कारासाठी एक दिवस पॅरोल दिला आहे. त्याचबरोबर पोलिसांना गंगा घाटावर अंत्यसंस्कारासाठी सुरक्षेचेही आदेश देण्यात आले होते.

खोट्या खटल्यात कुटुंबाला अडकवण्याची धमकी दिली, पत्रात दावा
पत्रात पीडिता व तिची आई म्हणते, आम्हाला भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्याकडून धमक्या दिला जात आहेत. १२ जुलै रोजी हे पत्र पाठवण्यात आले होते. पत्राद्वारे सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. पीडितेच्या रस्ते अपघाताच्या २० दिवस आधी कुलदीप सेंगरच्या भावाने पीडितेच्या घरी जाऊन धमकी दिली होती, असे पत्रातील मायना सांगतो. त्याशिवाय या प्रकरणात अत्याचाराच्या प्रकरणातील अन्य आरोपी शशीसिंहच्या मुलानेदेखील वाईट परिणाम भोगावे लागतील. संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात डांबण्याची धमकी दिली होती. केस मागे घेण्यावरून सातत्याने दबाव वाढू लागल्याची तक्रारही पत्राद्वारे पीडितेने केली आहे.

पीडितेची प्रकृती नाजूक, मृत्यूची अफवा

मृत्यूचीही अफवा फेटाळली
किंग जॉर्ज मेडिकल विद्यापीठाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दिवसभरात अनेक वेळा पीडितेचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे प्रशासन हादरले होते. वृत्त लिहीपर्यंत पीडिता व वकिलाची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आले होते. ट्रॉमा सेंटरचे प्रभारी संदीप तिवारी व लखनऊचे जिल्हाधिकारी राज शर्मा यांनी जखमींच्या उपचाराची माहिती दिली व अफवा फेटाळून लावल्या.

मालीवाल यांनी दुसऱ्यांदा घेतली भेट
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी मंगळवारी दुसऱ्यांदा पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, सरकार आपले काम कुलदीप सेंगरमार्फत करवून घेते. त्यामुळेच कारवाई होत नाही. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सचिव ज्योती सिंघल व महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुष्मिता देवही त्यांच्या भेटीसाठी आल्या.

भाजप निलंबित का करत नाही : प्रियंका
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींनी या प्रकरणी ट्विट केले. भाजपकडून आरोपी आमदारास निलंबित करायला हवे. आतापर्यंत या आमदाराची पक्षातून हकालपट्टी का करण्यात आली नाही ? त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल होता. आता हत्या व हत्येचा प्रयत्न इत्यादी प्रकरणेही दाखल आहेत. भाजप कोणाची प्रतीक्षा करत आहे? सोमवारी प्रियंका यांनी असे प्रश्न विचारले होते.

ट्रकमालकाचा संबंध नसल्याचा दावा
पीडितेच्या कारला धडक मारणाऱ्या ट्रकचे मालक नंदकिशोर लालने आमदार सेंगर यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाबद्दल ऐकले होते, परंतु पीडितेला कधीही पाहिले नाही. नंदकिशोर लाल आधी सपामध्ये होते. आरोपी ट्रकचालकाचे काका बाबूलाल म्हणाले, आमचा नेते किंवा राजकीय पुढाऱ्यांशी काहीही संबंध नाही.

X