Crime / Shocking: गाडा लावून कचोरी विकणारा निघाला करोडपती; आयकर विभागाने बजावली नोटीस

वार्षिक कमाई 1 कोटी, पकडले गेल्यावर म्हणाला -मी सामान्य कचोरीवाला

वृत्तसंस्था

Jun 25,2019 03:12:00 PM IST

अलीगड - रस्त्यावर गाडा लावून कचोरी विकणाऱ्याची कमाई किती असेल? कुणालाही वाटेल की कचोरी, पाणीपुरी किंवा चाट भांडार विक्रेते पोट भरेल एवढीच कमाई करतात. परंतु, उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये एक असे प्रकरण समोर आले की गाड्यावर फास्टफूड विकणाऱ्यांबद्दलचा आपला दृष्टीकोन नेहमीसाठी बदलेल. अलीगडच्या सिनेमा हॉलजवळ कचोरीचा गाडा लावणाऱ्या मुकेशला आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. रोज सकाळी कचोरी आणि समोसा विकणाऱ्या मुकेशला आयकर विभागाची नोटीस बजावल्याचे वृत्त ऐकून अनेकांना प्रशासकीय चूक वाटत होते. परंतु, जेव्हा मुकेशची वार्षिक कमाई समोर आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.


वर्षाला 1 कोटी रुपयांपर्यंत कमवतो मुकेश कचोरीवाला...
अलीगडच्या सीमा टॉकीसजवळ मुकेश कचोरी नावाचा एक गाडा लागतो. रोज सकाळी समोसा आणि कचोरी घेणाऱ्यांच्या येथे रांगा लागलेल्या असतात. त्याच स्टॉलच्या मालकाला आयकतर विभागाने नोटीस बजावली आहे. त्याच्याविरुद्ध एकाने तक्रार दाखल केली होती. चौकशी केली असताना त्याची वार्षिक कमाई 60 लाख ते 1 कोटी रुपयांच्या घरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कोट्यधींची कमाई करूनही त्याने आपल्या दुकानाचे (गाड्याचे) जीएसटी नोंदणी तर सोडा कमर्शिअल रेजिस्ट्रेशन सुद्धा केले नाही.


मी सामान्य कचोरीवाला, काय घडतेय काहीच कळेना...
कचोरी स्टॉलचा मालक मुकेशने स्वतःला निर्दोष म्हटले आहे. "मी तर केवळ एक सामान्य कचोरी विक्रेता आहे. गेल्या 12 वर्षांपासून मी या ठिकाणी समोसा आणि कचोरी विकतो. यापूर्वी मला कुणीही कधीच अशा स्वरुपाच्या औपचारिकता करण्यास सांगितलेले नाही. आम्ही सामान्य माणसं आहोत. केवळ पोट भरण्यासाठी कचोरी विकतो."


अधिकारी म्हणाले, मुकेशने दिली कोट्यधींच्या कमाईची कबुली
जीएसटीच्या नियमानुसार, 40 लाख किंवा त्यापेक्षा अधिकची कमाई असलेल्या प्रत्येक व्यावसायिकाला जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यातही खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना 5 टक्के सूटही दिली जाते. परंतु, 60 लाख ते 1 कोटींची कमाई असतानाही मुकेशने कधीच नोंदणी केली नाही. आयकर विभागाच्या स्टेट इंटेलिजेन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, मुकेश काही सामान्य कचोरी विक्रेता नाही. त्याने स्वतः आपल्या कोट्यधींच्या कमाईबद्दल कबुली दिली आहे. एवढेच नव्हे, तर तो कच्च्या माल, तेल आणि एलपीजीवर किती खर्च करतो याची माहिती सुद्धा आम्हाला मिळाली.

X
COMMENT