आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Up News Speedy Truck Rams Into Unnao Rape Victim Family Car Road Accident, 2 Killed Victim Serious

भाजप आमदारावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीच्या कारवर धडकले भरधाव ट्रक; काकूसह मावशीचा मृत्यू, पीडित तरुणी गंभीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्नाव / रायबरेली - उन्नावच्या चर्चित बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कारला सोमवारी भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात पीडित तरुणी, तिची मोठी बहिण आणि कोर्टात बाजू मांडणाऱ्या महिला वकील गंभीर जखमी आहेत. तर तरुणीच्या काकू आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी प्राथमिक तपासात या घटनेला अपघात म्हटले आहे. परंतु, उन्नाव बलात्कार प्रकरणात येणारे नाटकीय वळण आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहता घात-पाताची शक्यता वर्तवली जात आहे. पीडितेने काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि काकांना एका प्रकरणात तुरुंगात डांबण्यात आले. त्यांनाच भेटण्यासाठी जात असताना ट्रक आणि कारचा अपघात झाला.


पीडित तरुणीचे काका रायबरेली येथील तुरुंगात कैद आहेत. त्यांनाच भेटण्यासाठी कुटुंब निघाले होते. परंतु, एनएच-32 वर अचानक त्यांच्या कारला भरधाव ट्रकने धडक दिली. स्थानिकांनी मृतांना आणि जखमींना बाहेर काढले आणि आपातकालीन नंबर डायल करून मदत बोलावली. यानंतर पोलिसांनी जखमींना लखनौ येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी मावशी आणि काकूला मृत घोषित केले. तर वकील महेंद्र सिंह, पीडित तरुणी आणि तिची मोठी बहीण सध्या गंभीर आहेत.


ट्रकची नंबर प्लेट काळी होती, तरीही एसपी म्हणतात निव्वळ अपघात
पीडित तरुणीच्या मामांनी या घटनेला अपघात नाही, तर घातपाताचा पूर्वनियोजित कट म्हटले आहे. ज्या ट्रकने पीडितेच्या कुटुंबियांच्या कारला धडक दिली त्याची नंबर प्लेट आधीच काळी करण्यात आली होती. अर्थातच, धडक देऊन निघाल्यानंतर कुणालाच नंबर कळू नये अशी योजना होती. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहेत. तरीही पोलिस महानिरीक्षक सुनिल सिंह यांनी ही घटना केवळ अपघात असल्याचे म्हटले. परंतु, कुटुंबियांचे आरोप पाहता, त्यांनी चौकशीचे आश्वासनही दिले. सोबतच, पोलिसांनी ट्रक चालकासह मालकाला देखील अटक केली आहे.


पोलिस संरक्षण दिले होते, मग कुठे होते पोलिस?
उल्लेखनीय बाब म्हणजे, अन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला पोलिस संरक्षण मिळाले होते. त्यानुसार, तिच्यासोबत नेहमीच दोन सशस्त्र पोलिस सोबत असणे अपेक्षित होते. परंतु, अपघात घडला त्यावेळी पोलिस त्या ठिकाणी दिसलेच नाहीत. दरम्यान, आरोपी कुलदीप सिंह सध्या सीतापूर जेलमध्ये कैद असून या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरू आहे.
 

बातम्या आणखी आहेत...