आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 'Uri : The Surgical Strike' Attempts To Uncover The Truth By Showing What Happened: Aditya Dhar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'उरी : द सर्जिकल स्ट्राइक'मध्ये घडलेल्या घटना दाखवून सत्य उलगडण्याचा प्रयत्न : आदित्य धर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी : 'हाऊ इज द जोश...' हे शब्द हिंदी चित्रपट रसिकांच्या मनांवर कोरले गेले. 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटातील हा संवाद लोकांच्या मनात अजूनही तरंग निर्माण करत असून आता अनेक प्रसंगी लोकांनी हा संवाद वापरायला सुरुवात केली आहे. 'उरी' चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर आणि 'भोंगा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी 'दिव्य मराठी'शी या वेळी संवाद साधला.

उरी चित्रपटाच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेले प्रसंग सांगताना आदित्य धर म्हणाले की, मी एका चित्रपटावर काम करत असताना उरी हल्ला घडला आणि पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जायला सांगण्यात आले. ही समस्या एक उत्तम कथा मांडण्याकरिता माझ्यासाठी एक संधी ठरली, असे त्यांनी स्पष्ट केले. हा चित्रपट भारतीय सैन्य दल आणि त्यांच्या कुटुंबीयांना आदरांजली म्हणून निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

'हाऊ इज द जोश...' या अतिशय लोकप्रिय झालेल्या संवादाबद्दल बोलताना धर म्हणाले की, हा संवाद पटकथेचा हिस्सा होता, पण सुरुवातीला हे वाक्य उच्चारणं विकी कौशलला फारसे रुचत नव्हते, पण सैनिकांना यामुळे प्रेरणा मिळते हे मी त्याला पटवून दिले. त्याने हे वाक्य जेव्हा उच्चारले तेव्हा तो तसेच आजूबाजूच्या सर्वांच्या अंगावर शहारे आले आणि त्यामुळेच आम्ही हा संवाद चित्रपटात ठेवण्याचा निर्णय घेतला.

उरी हा प्रचारपट असल्याच्या टीकेला उत्तर देताना आदित्य धर म्हणाले की, उरी हल्ल्यानंतर ज्या घटना घडल्या त्या क्रमवारीने दाखवून खरेपणा दर्शवला आहे. या प्रक्रियेत सरकारचे तसेच इतर तांत्रिक पथकांचे योगदान दृष्टीआड करता येणार नाही, असे ते म्हणाले. समाजातल्या काही भागाला हा प्रचारपट असल्याचे वाटत असेल तर मी याबद्दल काहीच करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विकी कौशल सुपरहीरोची भूमिका करत असणाऱ्या 'अश्वत्थामा' या आगामी चित्रपटाबद्दलही त्यांनी माहिती दिली.

भोंगा (ध्वनिक्षेपक)

ध्वनिक्षेपकावरून अजानची घोषणा होत असताना एका गावातील नऊ महिन्यांचा मुलगा झोपत नाही आणि सारखा रडत राहतो आणि ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे त्याला त्रास होत असल्याचे त्याच्या कुटुंबाच्या लक्षात येते. ध्वनिक्षेपकाचा आवाज बंद करावा अथवा तो दुसरीकडे हलवावा, अशी या कुटुंबीयांची विनंती मान्य होत नाही. एकेदिवशी या मुलाचा मृत्यू होतो आणि संपूर्ण गावाला धक्काच बसतो. त्याचे वडील बांग देणाऱ्याला दोषी धरतात आणि मुलाच्या अंत्यसंस्कारापासून दूर राहावे, असेही सुनावतात. या सर्वांमुळे दु:खी झाल्यानंतर आता बांग देणारा ध्वनिक्षेपकाशिवाय बांग देतो.

भोंगा.. ध्वनी प्रदूषण तसेच या प्रदूषणाचा आजूबाजूला विशेषत: मुलांवर होणार परिणाम हा विषय भोंगा चित्रपटात दाखवण्यात आल्याचे ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांगितले. लोकांवर ध्वनी प्रदूषणाचा दुष्परिणाम होत असून या विषयाकडे कोणी तरी लक्ष वेधण्याची गरज होती. हा संवेदनशील विषय आहे.प्रादेशिक चित्रपट निर्मात्यांपुढील समस्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, या चित्रपटांच्या निर्मितीत जोखीम असते. मराठी चित्रपट उद्योगात तुम्हाला चांगले विषय मिळतात, पण त्यासाठी कोणालाही निधी द्यायचा नसतो, असेही ते म्हणाले. चांगली प्रसिद्धी केली नाही तर हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृहेदेखील उत्सुक नसतात. त्यामुळे कमी खर्चात उत्तम चित्रपट बनवण्यासाठी आम्हाला आधी कष्ट करावे लागतात, असेही ते म्हणाले. या वेळी भोंगा चित्रपटाचे निर्माते अरुण हिरामण महाजन आणि कलाकार श्रीपाद जोशी तसेच कपिल कांबळे यांचीदेखील उपस्थिती होती.

'उरी : द सर्जिकल स्ट्राइक'

१८ सप्टेंबर २०१६ रोजी चार दहशतवाद्यांनी उरी तळावर हल्ला चढवून १९ भारतीय सैनिकांना ठार केले. त्यानंतर २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल अतिशय परिणामकारक सर्जिकल स्ट्राइक केला. या घटनाक्रमावर आधारित हा चित्रपट आदित्य धर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकमधील ११ घटना दाखवण्यात आल्या आहेत.