आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्मिला, यह तो होना ही था! (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोज डझनावरी नेते काँग्रेस सोडतात, पण सोडचिठ्ठी गाजली ती ऊर्मिलाची. तिच्या निर्णयाचा चटका जितका मराठी मुंबईकरांना बसला, तितका काँग्रेसच्या नेत्यांनाही बसला नाही. ऊर्मिलाच्या निर्णयाचं मुंबई काँग्रेसला अजूनही सोयरसुतक नाही. तिच्या मेकअपचा खर्चसुद्धा पक्ष कसा पुरवत होता, ऊर्मिला हसायचे पण पैसे घेत होती, तिच्या या ‘अवास्तव’ मागण्या बिगर सत्ताधारी पक्षाला पूर्ण करणं शक्य नव्हतं, अशा सुरस कथा आता काँग्रेसचे नेते ऐकवत आहेत. मुंबईत ६ लोकसभा मतदारसंघ आहेत. पैकी काँग्रेसकडे एकही नाही. ३६ आमदार आहेत, त्यातले पाचच काँग्रेसचे. राजधानीत काँग्रेस इतकी दुबळी आहे. उत्तर मुंबईत तर काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. भाजपच्या गोपाळ शेट्टींपुढे लढायची कुणाची छाती नव्हती. ते आव्हान मराठी ऊर्मिलाने स्वीकारले. तिने आक्रमक प्रचार केला. ती झोपडपट्टीत गेली. रस्त्यावर गाणी गायली. मुलांत क्रिकेट खेळली. रिक्षा चालवली. गुजराती, मराठी, हिंदी, इंग्रजीतून भाषणं केली.  माध्यमांच्या नाना प्रश्नांना तोंड दिले. ट्रोलर्सना भिडली. विरोधी पक्षाचे हल्ले परतवले. स्वत:चा प्रचार तर केलाच, पक्षाच्या उमेदवारांनाही हातभार लावला. तिच्यामुळे प्रचारात काँग्रेस जिंवत असल्याचं भासलं. पण, व्हायचं तेच झालं. भाजप जिंकणारच होता. तशी ऊर्मिला हरली. पण, तिचं म्हणणं होतं, माझा विश्वासघात केलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी. काँग्रेसमध्ये असं होत नाही. कारवाईचं सोडा, तिचे गोपनीय पत्रच जगजाहीर करण्यात आले. मुळात ऊर्मिला पक्षात आली संजय निरुपम यांच्यामुळे. नंतर महिनाभरात निरुपम यांची अध्यक्षपदावरून गच्छंती झाली. कुलाब्याचे मिलिंद देवरा मुंबई अध्यक्ष झाले. दोन महिन्यांत देवराही गेले. अध्यक्ष झाले धारावीचे एकनाथ गायकवाड. आता ऊर्मिलाची दखल घेणार तरी कोण? त्यात पक्ष सध्या तंगीत आहे. आंदोलने, सभा, बैठकांना पैसे कुणी काढायचे, हा मोठा प्रश्न आहे. ऊर्मिलाचा पक्षाला वापर तर करायचा होता, पण तिचा खर्च करायला पक्ष तयार नव्हता.  पाच महिन्यांत ऊर्मिलावर दोन कोटी खर्च झाल्याचे काँग्रेसचे नेते आता सांगत आहेत. मुळात उत्तर मुंबई मतदारसंघ राम नाईकांचा. येथून पाच वेळा रामभाऊ जिंकले. त्यांना धूळ चारण्यासाठी काँग्रेसने २००४ च्या निवडणुकीत अभिनेता गोविंदाला आणले. ताे जिंकलाही. मात्र पाच वर्षांतच परत गेला आणि संजय निरुपम आले. पण, हा मतदारसंघ काँग्रेसने कधी बांधला नाही. त्यामुळे गोपाळ शेट्टींनी बस्तान बसवले. त्यांच्यासमाेर पुन्हा ‘गाेविंदा प्रयाेग’ करण्यासाठी काँग्रेसने ऊर्मिलाला गळ घातली. तर हे असं मुंबई काँग्रेसचं धोरण. विशेष म्हणजे लाेकसभा निवडणुकीत माेदींच्या मुंबईत सहा सभा झाल्या. राहुल गांधी फिरकले नाहीत. काँग्रेसमध्ये असा पायापासून कळसापर्यंत गलथानपणा आहे. मग, ऊर्मिलाचे ऐकणार कोण आणि ती सांगणार तरी कुणाला ? म्हणून, ऊर्मिलाच्या निर्णयाचा अचंबा वाटायचं कारण नाही. यह तो होना ही था.

बातम्या आणखी आहेत...