आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाथाळ्या, उपेक्षा, निधीच्या चणचणीला वैतागून उर्मिलाचा काँग्रेसला रामराम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मार्चमध्ये बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी ती म्हणाली होती, 'मी निवडणुकीपुरती काँग्रेसमध्ये आलेली नाही, काँग्रेस माझी विचारधारा आहे. निवडणुकीनंतरही मी कार्यरत असेन', असे वचनही तिने दिले होते. प्रत्यक्षात तिने पाचच महिन्यांत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मंगळवारी तिने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दोन ओळीचा राजीनामा पाठवला. तिच्या ५ महिन्यांच्या कारकीर्दीत मुंबई काँग्रेसचे तीन अध्यक्ष झाले. तिच्या राजीनाम्याला मुंबई काँग्रेसमधल्या लाथाळ्या कारणीभूत आहेतच, शिवाय अधांतरी राजकीय भवितव्य आणि पक्षाकडे असलेली निधीची चणचण आदी कारणेही असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. मी पक्षांतर्गत राजकारणासाठी वापरली जाऊ देण्यास तयार नाही, असे कारण तिने पक्ष सोडताना दिले आहे. मात्र उर्मिलाच्या या सोडचिठ्ठीमागे इतर कारणेसुद्धा आहेत.

राजीनाम्यानंतर साेशल मीडियावर उर्मिलाचे असे मीम्स व्हायरल झाले.

सोडचिठ्ठीमागे अनेक कारणे : मिलिंद देवरा, संजय निरूपमसह अनेक नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा
१ - तत्कालीन मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी उर्मिलाला पक्षात आणले. लोकसभा निवडणुकीत उर्मिलाची सर्व जबाबदारी संदेश कोंडवीलकर, अशोक सुत्राळे आणि भूषण पाटील यांच्यावर होती. पराभवानंतर या तिघांनी काम न केल्याचा उर्मिलाने आरोप केला. त्या संदर्भात तिने तिघांवर कारवाई करावी, असे पत्र लिहिले. पक्षाने कारवाई केली नाही. मात्र तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी निरुपम यांना उघडे पाडण्यासाठी उर्मिलाचे पत्र माध्यमांकडे पोचवले. त्यामुळे उर्मिला दुखावली गेली.
२ - उत्तर मुंबई हा निरुपम यांचा लोकसभा मतदारसंघ होता. यावेळी निरुपम यांनीच तेथून दुसऱ्या मतदारसंघात पलायन केले आहे. मुळात काँग्रेस येथे अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळे उर्मिलास येथे काही राजकीय भवितव्य दिसत नव्हते.
३ - विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रचारासाठी उर्मिलाला वापरणार होती. पण, उर्मिलासाठी पक्षाकडे विशेष निधीची अशी काही सोय नव्हती. निधीवरून उर्मिला व काँग्रेसमधले मतभेद चव्हाट्यावर आले होते.
४ - उत्तर मुंबईतल्या सहा विधानसभा मतदारसंघात उर्मिला मातोंडकर ही तिच्या पाठीराख्यांसाठी विधानसभेची उमेदवारी मागत होती. पण, काँग्रेस पक्षाने तिच्या मागणीला दाद दिली नाही.यामुळे तिची मोठी निराशा झाली.
५ - लोकसभेनंतर पक्षाने उर्मिलाशी संपर्क ठेवला नव्हता. कोल्हापूर, सांगली पूरग्रस्त भागात तिने दौरा केला. मात्र, तिच्यावर जबाबदारी दिली नव्हती. पक्षाच्या बैठकांना ती उपस्थित राहात नव्हती, मात्र ट्विटरवर सक्रिय होती.

पक्षांतर्गत कारस्थानासाठी वापरले जाण्यास मन तयार नाही : उर्मिला
माझे पत्र लीक केले गेले. मी निषेध करूनही कुणी दिलगिरी व्यक्त केली नाही. काँग्रेसच्या अत्यंत निराशाजनक कामगिरीबद्दल पत्रात नामोल्लेख केलेल्या व्यक्तींवर कारवाईऐवजी नवीन पदांचे बक्षीस दिले गेले.

मुंबई काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षाच्या विचारधारेशी बांधील नाहीत. मुंबई काँग्रेसमधील मोठ्या ध्येयांवर काम करण्याऐवजी पक्षांतर्गत कटकारस्थानाशी लढा देण्यासाठी वापर करण्यास माझी राजकीय आणि सामाजिक संवेदनशीलता मला अनुमती देण्यास नकार देते.