आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्या हट्टामुळे अमेरिकेत Shut Down लागू, ऐन ख्रिस्मसला होणार नाही 8 लाख कर्मचाऱ्यांचा पगार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हट्टामुळे सरकारला शटडाऊन लागू करावा लागला आहे. नुकतेच त्यांनी अमेरिकन संसदेला मेक्सिको सीमेवर भिंत उभारण्यासाठी निधी देण्याची मागणी केली होती. नकार दिल्यास सरकार खर्चांवर (बजेटवर) अधिकृत स्वाक्षरी करणार नाही अशी धमकी त्यांनी खासदारांना दिली होती. यासंदर्भात वरिष्ठ सभागृहाच्या खासदारांची महत्वाची बैठकही आयोजित करण्यात आली. परंतु, त्या बैठकीत भिंतीसाठी निधी देण्यास एकमत होऊ शकले नाही. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बजेटवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आणि शनिवारी मध्यरात्रीपासून अमेरिकेत तात्पुरते शट डाऊन लागू करण्यात आले आहे. 

 

8 लाख कर्मचारी पगारापासून वंचित
जगभरात ख्रिस्मसचा उत्साह सुरू आहे. परंतु, अमेरिकेत शटडाऊन लागू होत असल्याने 8 लाख कर्मचाऱ्यांपैकी 3.8 लाख कर्मचाऱ्यांना बिनपगारी सुटीवर जावे लागेल. तर उर्वरीत 4.20 लाख कर्मचाऱ्यांना काम करावे लागेल. परंतु, त्याचा मोबदला मिळणार नाही. अर्थातच या रजेदरम्यान त्यापैकी कुणालाही वेतन दिला जाणार नाही. या शटडाऊनचा फटका शनिवारी मध्यरात्रीपासून केंद्र सरकारच्या 1/4 कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यामध्ये पोलिस विभाग, परिवहन विभाग, कृषी विभाग, परराष्ट्र मंत्रालय आणि न्यायालयीन विभागाचा समावेश आहे. एवढेच नव्हे, तर राष्ट्रीय अभयारण्य आणि जंगले सुद्धा बंद ठेवली जात आहेत.


वादग्रस्त भिंतीसाठी लागतील 40 हजार कोटी रुपये...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसकडे (अमेरिकन संसद) मेक्सिको सीमेवर भिंत उभारण्यासाठी 5.7 अब्ज अमेरिकन डॉलरची (350 अब्ज रुपये) मागणी केली होती. ट्रम्प यांनी इशारा दिला होता, की काँग्रेस या भिंतीसाठी निधीला मंजूरी देत नसेल तर सरकारी खर्चांवर स्वाक्षरी करणार नाही. अमेरिकेत केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि प्रशासनाचा खर्च चालवण्यासाठी राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी आवश्यक असते. तसेच देशाच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या खर्चास संसदेची मंजुरी आवश्य असते. ट्रम्प यांना आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी सिनेटमध्ये 60 मते मिळवणे आवश्यक होते. परंतु, सद्यस्थितीला सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे 51 उमेदवारच आहेत. ट्रम्प यांनी सही करण्यास नकार देऊन अमेरिकेत पुन्हा शट डाऊन लागू केले आहे.

बातम्या आणखी आहेत...