Politics / Cyber Attack: अमेरिकेने इराणवर केला सायबर हल्ला, मिसाईल यंत्रणा केली हॅक; अनेक संगणक निकामी

थोडक्यात जाणून घ्या, इराण आणि अमेरिकेतील वादाचे मूळ कारण...

दिव्य मराठी वेब

Jun 23,2019 10:52:00 AM IST

वॉशिंग्टन - इराणने अमेरिकेचे सर्वात महागडे ड्रोन पाडल्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने अत्याधुनिकरित्या बदला घेतला आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, अमेरिकेने इराणवर सायबर हल्ला केला आहे. यामध्ये प्रामुख्याने इराणच्या शस्त्रास्त्र यंत्रणेला हॅक करण्यात आले. परिणामी इराणची मिसाइल यंत्रणा आणि संगणक निकामी झाले. या सायबर हल्ल्याच्या 24 तासांपूर्वीच इराणने अमेरिकेच्या ऑइल टँकरवर हल्ला केला. तसेच एक अत्याधुनिक आणि जगातील सर्वात महागडे ड्रोन हाणून पाडले होते. त्याचाच अमेरिकेने बदला घेतला आहे.


अमेरिकेने अशी केली सायबर हल्ल्याची प्लॅनिंग...
इराणकडून गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेच्या तेल टँकरवर हल्ले केले जात होते. ओमानच्या खाडीत इराणने कथितरित्या भूसुरुंग स्फोट घडवून हल्ले केल्याचे आरोप आहेत. त्याचा सूड उगवण्यासाठी अमेरिकेने सायबर हल्ल्यांची गुप्त प्लॅनिंग सुरू केली होती. त्यातच इराणने शुक्रवारी (21 जून) अमेरिकेचे ड्रोन हाणून पाडले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला तडकाफडकी इराणवर हल्ल्यांचे आदेश जारी केले. परंतु, अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर ते आदेश परतही घेतले. यानंतरच इराणच्या शस्त्रास्त्र यंत्रणेला हॅक करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, इराणच्या रेव्होल्युशनेरी गार्ड्स अर्थात लष्कराने ज्या मिसाइल यंत्रणेने अमेरिकन ड्रोन पाडले, सायबर हल्ल्यात ती यंत्रणा देखील हॅक करण्यात आली. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, इराणची शस्त्रास्त्र यंत्रणा काही काळ ऑफलाइन करणे या सायबर हल्ल्याचा हेतू होता.


हे आहे अमेरिका आणि इराणच्या वादाचे कारण...
उल्लेखनीय बाब म्हणजे, 2015 मध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि रशियासह इराण अर्थात पी5+1 राष्ट्रांनी एकत्रित येऊन इराण नागरी अणु करार केला होता. गेल्या कित्येक वर्षांपासून इराणवर युरेनियम उत्पादन आणि अणुबॉम्ब निर्मितीचे आरोप केले जात होते. या करारातून इराणच्या आण्विक हालचालींवर नियंत्रण ठेवणे आणि त्या बदल्यात इराणवरील निर्बंध शिथील करण्यात आले होते. सोबतच, इराणच्या आर्थिक विकासासाठी वित्तपोषण सुद्धा करण्यात आले होते. परंतु, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार गुंडाळण्यासाठी हालचाली सुरू केल्या. निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या आश्वासनांप्रमाणे ट्रम्प यांनी गतवर्षीच इराण नागरी अणु करार रद्द केला. तसेच शिथिल करण्यात आलेले इराणवरील निर्बंध पुन्हा लागू केले. परिणामी इराणची अर्थव्यवस्था ढासळली आणि दोन्ही देशांचा वाद शिगेला पोहोचला.

X
COMMENT