Article 370 / भारताविरुद्ध आक्रमक होणे सोडा, दहशतवादविरुद्ध कठोर कारवाई करा! कलम 370 हटवल्यानंतर अमेरिकेचा पाकला इशारा

अमेरिकेने पाकिस्तानला इशारा देताना भारताला सुद्धा लोकशाहीवर दिले उपदेश

दिव्य मराठी वेब

Aug 08,2019 10:38:00 AM IST

वॉशिंग्टन - भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले तेव्हापासूनच पाकिस्तानचे नेते युद्धाची भाषा करत आहेत. अशात अमेरिकेने भारताची पाठराखण केली आहे. एवढेच नव्हे, तर भारताविरुद्ध आक्रमक प्रतिक्रिया देणे सोडून थेट आपल्या देशातील दहशतवादावर कठोर कारवाई करा. तसेच भारतात घुसणाऱ्या पाकिस्तानी घुसखोरांना थांबवा असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला. अमेरिकन काँग्रेसच्या परराष्ट्र संबंधांवरील तज्ज्ञ समितीने ही प्रतिक्रिया जारी केली आहे.

भारतालाही दिले लोकशाहीवर उपदेश
अमेरिकेच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृहाच्या समित्यांनी संयुक्तरित्या प्रतिक्रिया जारी करताना भारताला सुद्धा उपदेश दिले. "लोकशाहीमध्ये पारदर्शकता आणि राजकीय सहभाग खूप महत्वाचा आहे. भारत सरकारने (कलम 370 रद्द करताना) जम्मू आणि काश्मीरमध्ये या गोष्टींचा विचार केला असेल अशी अपेक्षा करतो. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे, सर्वच नागरिकांना महत्व, त्यांना माहिती मिळणे आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे ही भारताची जबाबदारी आहे." असे या जाहिरनाम्यात सांगण्यात आले आहे.


इम्रान खान यांची ब्रिटिश पंतप्रधानांसह सौदी शासकांशी चर्चा
कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सुद्धा घबराट पसरली आहे. तरीही पाकिस्तानला या मुद्द्यावर कुठलाही देश खुले समर्थन देण्यास तयार नाही. त्यामुळेच, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी ब्रिटिश पीएम बोरिस जॉन्सन आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारताने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरातून कलम 370 रद्द केले. तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले. जम्मू-कश्मीरात 20 जिल्हे आणि विधानसभा असेल. तर लडाखमध्ये 2 जिल्हे असतील.

X
COMMENT