आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन रद्द करून निधी शेतकऱ्यांसाठी वापरा; नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- यवतमाळमध्ये आयोजित अ. भा. साहित्य संमेलनाच्या उद्घाटक प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण नाकारून आयोजकांनी मोठी नामुष्की ओढवून घेतली. अनेक साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकल्याने हे संमेलन अधिक वादात अडकले. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांतही नाराजीचा सूर उमटत आहे. संमेलन रद्द करा व तो खर्च शेतकरी, त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी वापरावा, अशी मागणी जोर धरत आहे. अनेक साहित्यिक, शेतकरी नेत्यांसह मान्यवरांनी त्याचे समर्थन करत या संमेलन जत्रेवर जोरदार टीका चालवली आहे. 

 

संमेलन जिथे हाेत आहे हाेत ते यवतमाळ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मोठमोठ्या घोषणा आणि उपाययोजना नंतरही या जिल्ह्यात गेल्या एका वर्षात २५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २००१ पासून आतापर्यंतचा हा आकडा ३८०० पर्यंत पोहोचला आहे. अशा या भागात होणाऱ्या साहित्य संमेलनावर दोन ते अडीच कोटी खर्च होणार आहेत. त्याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. संमेलनात शेतकऱ्यांचा, ग्रामीण भागाचा हुंकार उमटणारा कोणताही ठळक कार्यक्रम नाही (अपवाद वगळता) त्यामुळे आधीच संशय आहे.या पार्श्वभूमीवर संमेलनासाठी आजवर झाला ताे खर्च जाऊ द्या, मात्र किमान यापुढे तरी हे वादात अडकलेले संमेलन रद्द करा आणि पुढचा खर्च शेतकऱ्यांसाठी वापरा ही मागणी समोर येत आहे. 

 

पॅकेज द्या : रक्षक 
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात संमेलन ठेवले. त्यातही इतके वाद समोर आले. त्यावर मोठा खर्च केला जाणार आहे. त्यात साहित्यिकांनीच बहिष्कार टाकलेला आहे. अजून मोठा खर्च व्हायचा बाकी आहे. संमेलन रद्द करून उरणाऱ्या पैशातून यवतमाळ जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांना उपयोगी पडेल, असे एखादे पॅकेज दिले तर एक नवा चांगला पायंडा पडेल, असे मत गुरुदेव सेवा संघटनेचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी व्यक्त केले आहे. 

 

खरकट्या पत्रावळीवर बसणार का 
या साहित्य संमेलनाला काहीच अर्थ नाही. विशिष्ट कंपूचा सरकारी कार्यक्रम आहे. तेथे सगळीच बोगसगिरी आहे. त्याचा सोस कशाला हवा. साहित्यिकांनी जनतेत जावे, सोहळे हवेत कशाला? संमेलनात जे जातील ते नयनतारा सहगल यांच्या भूमिकेचे विरोधक आहेत, हे सिद्ध होईल. लोकशाही धोक्यात असताना असला भिकारचोटपणा त्यांनी दाखवू नये. खरकट्या पत्रावळीवर जाऊन बसण्याचा निर्लज्जपणा कोणीच करू नये, छुपी आणीबाणी लादण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उघडे पाडावे, असे मत कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी व्यक्त केले. 
 
सूचनेचा गंभीर विचार व्हावा : किशाेर तिवारी 
फालतू लोकांनी घोळ घालून यवतमाळचे वातावरण खराब केले. आयोजक मस्तावले आहेत. अनेकांचा अपमान होत आहे. श्रीपाद जोशींची भूमिका संशयास्पद असल्याने याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा. निधीतून शेतकऱ्यांना मदत देण्याची सूचना समोर येत असेल तर आयोजकांनी त्यावर गंभीर विचार करावा, असे मत शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांनी व्यक्त केले. 

 

यांच्याकडून अपेक्षाच नाही : शेट्टी 
संमेलने व्हायला हवीत, पण शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ते होताना, शेतकरी आणि त्याची दुरवस्था रोखण्यासाठी तेथे विचारमंथन होणे गरजेचे होते. संमेलन सर्वसामान्यांपासून दुरावलेले आहे. शेती व्यवसायाचे दुःख त्यात प्रतिबिंबित होत नाही, ही खेदाची बाब आहे. हे सारे वाद राजकीय स्वरूपाचे आहेत. त्यापेक्षा निधी शेतकऱ्यांसाठी वापरावा, असे मत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. 

 

मुख्यमंत्र्यांनीच जाऊ नये : वानखडे 
हे साहित्य संमेलन या पातळीवर रद्द केल्यास आयोजन समितीच्या आतापर्यंतच्या कामावर पाणी फिरेल. पण ज्या कारणासाठी सहगल यांना यायला रोखले तसेच मुख्यमंत्री आले तर ते उधळण्याची धमकी आलेली आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच तेथे जाणे रद्द करावे. साहित्यिकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय असे का, असा सवाल ज्येष्ठ शेतकरी नेते आणि साहित्यिक चंद्रकांत वानखडे यांनी उपस्थित केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...