Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Use may tricks to defend babasaheb Ambedkar in election 65 year ago

भंडाऱ्यात ६५ वर्षांपूर्वी : बाबासाहेबांना पाडण्यासाठीही फोडाफोडी अन् मतदारांना आमिष, धमकी

प्रतिनिधी | Update - Apr 14, 2019, 10:09 AM IST

शेड्यूल कास्ट फेडरेशनचे कार्यकर्ते काँग्रेसने फोडले आिण भाऊराव बोरकरांना उमेदवारी देऊन विजयी केले

 • Use may tricks to defend babasaheb Ambedkar in election 65 year ago

  औरंगाबाद - आत्ता जसे फोडाफोडी करून राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे करतात, अगदी तसेच काँग्रेसने १९५४ च्या भंडारा लोकसभा निवडणुकीतही शेड्यूल कास्ट फेडरेशनचे (शेकाफे) कार्यकर्ते फोडले होते. पैकी भाऊराव बोरकरांना काँग्रेसने उमेदवारी दिली. बाबासाहेबांच्या पराभवासाठी काँग्रेसने ६५ वर्षांपूर्वी केलेली ही खेळी आता तर सर्वच पक्षांचा ‘पॅटर्न’ बनलाय. लोकशाहीचे उद्गाते अन् संविधानाच्या शिल्पकाराचा त्या वेळी कसा पाडाव केला गेला, यासंदर्भातील खास विवेचन.

  मुंबईत १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत बाबासाहेबांचा १४ हजार ३७४ मतांनी पराभव झाला होता. काँग्रेसचे नारायण काजरोळकर यांनी १ लाख ३७ हजार ९५० मते घेतली, तर बाबासाहेबांना १ लाख २३ हजार ५७६ मते मिळाली होती. याच दरम्यान भंडाऱ्यातून निवडून आलेले चतुर्भुज जसानी आणि तुलाराम साखरे विजयी झाले होते. पण जसानी ठेकेदार असल्यामुळे त्यांना खासदारकी गमवावी लागली. निवडणूकीपूर्वी नागपुरात ‘शेकाफे’च्या बैठकीत बाबासाहेबांशी रावसाहेब ठवरे यांचा वाद झाला होता. त्यामुळे ठवरेंसह काही कार्यकर्ते बाबासाहेबांवर नाराज होते. या नाराजीचा फायदा घेत काँग्रेसचे तत्कालीन नेते नाशिकराव तिरपुडे आणि मनोहरभाई पटेल यांनी ठवरेंना काँग्रेसमध्ये ओढले. ठवरे समर्थक भाऊरावांना उभे केले.

  संघाने दिला सक्रिय पाठिंबा
  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तोपंत ठेंगडी, भास्कराव निनावे यांनी बाबासाहेबांचा प्रचार केला. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, दादासाहेब गायकवाड, दादासाहेब कुंभारे, माईसाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांचा प्रचार केला. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर पटेल पंडित नेहरूंचे विश्वासू होते. त्यांच्याच नेतृत्वात बाबासाहेबांना पाडण्यासाठी बाळकृष्ण वासनिक, नाशिकराव तिरपुडे, रावसाहेब ठवरे आणि बोरकर या टीमने काम केले.

  वसतिगृहात जेवण दिले
  मनोहरभाई आणि जसानींचा विडीचा व्यवसाय होता. विडी मजूर म्हणून दलित वर्ग त्यांच्याचकडे कामाला होता. विडी मजुरी काढू अशी धमकी दिल्यामुळे हवालदिल मतदारांवर त्याचा परिणाम झाला. शिवाय १ रुपया आणि १ मिठाची पुडी मतदारांना दिली. बाबासाहेबांच्या सभेला लोकांनी जाऊ नये म्हणून भारत सेवक सिद्धार्थ या मन्साराम राऊत यांच्या वसतिगृहात जेवण दिले गेले.

  ११ पैकी मी एकटाच विद्यार्थी हजर राहिलो
  ^मी त्या वेळी १४ वर्षांचा होतो. माझे शिक्षक भास्करराव पांढरीपांडे यांनी श्रीगणेश शाळेतील ११ विद्यार्थ्यांना सभेला जाण्यास सांगितले. पण मी एकटाच गेलो अन् सभेवर टिपणही लिहिले होते. बाबासाहेबांचा ८ हजार ६८१ मतांनी पराभव झाला. १ लाख ३२ हजार ४८३ मते त्यांना मिळाली. बोरकरांनी १ लाख ४१ हजार १६४ मते घेतली. बोरकर विजयी झाले, पण त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भंडाऱ्यातील लोकांनी कायमचा बहिष्कार टाकला होता
  -प्रा. वामन तुरिले, निवडणुकीचे साक्षीदार

Trending