आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटाच्या हायटेक महिला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील २६ गावांतल्या बचत गटांतील २७८३ महिला हायटेक झाल्यात. त्या आता ऑनलाइन व्यवहार करतात. आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत स्थापन झालेल्या तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र आणि नाबार्डच्या ‘ई-शक्ती’मुळे हे शक्य झालंय.

 

बचत गटाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या व्यवसायांना फायदा मिळावा, बचत गट आणि बँकेचा हिशोब चोख राहावा, या उद्देशाने शासनाने विविध योजना महिलांसाठी आणल्या. नाबार्डचा  ई-शक्ती प्रोजेक्ट त्यापैकीच एक. या कार्यक्रमांतर्गत गंगापूरच्या महिलांना ऑनलाइन बँकिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या सदस्य आता त्यांचे सर्व ट्रांझॅक्शन ऑनलाइन करतात. त्यांना प्रत्येक व्यवहाराची माहिती घरबसल्या अॅपवर मिळते. नाबार्डने एका गावात एक अॅनिमेटर नेमला आहे. त्यांच्या देखरेखीत महिला हे व्यवहार करतात. यात  सर्वप्रथम गटांचे ऑडिट केले जातेे. नंतर त्यांची प्रोफाइल अपलोड केली जाते. प्रत्येक महिलेचे आधार, पॅन कार्ड फीड केले जाते. नाबार्डने मोबाइलही उपलब्ध करून दिल्याचे साधन केंद्राच्या व्यवस्थापिका सुनीता सहाने सांगतात, तर या प्रशिक्षणामुळे आता आपसात पैशांवरून वाद होत नाहीत, असं जामगावच्या अपेक्षा महिला बचत गटाच्या अध्यक्षा वंदना देवकर म्हणतात. 

 

साडेतीन कोटींपर्यंत गेली गटाची ‘बचत’
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील २६ गावांत ३९३ बचत गट आहेत. यात ४१५० महिला आहेत. पैकी २७८३ महिला विविध व्यवसाय करतात. १७६० महिला शेतीतून उत्पन्न मिळवतात. २०१० पासून ते आतापर्यंत या महिलांना आर्थिक विकास महामंडळाने १२ कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले. ५० रुपयांपासून सुरू झालेली बचत आज साडेतीन कोटींपर्यंत गेली. हा आकडा जिल्ह्यात सर्वाधिक आहे. लाँड्री, मिनी डाळ मिल, मसाले, भांडे, कपडे,गाय-म्हैस-शेळी पालन, टॅक्टर, मेटॅडोर असे व्यवसाय ते करतात. 
 

 

औरंगाबाद जिल्ह्यातील ५ हजार बचत गट होतील डिजिटल
भारतात शंभर जिल्ह्यांत हा ईशक्ती प्रोजेक्ट सुरू आहे. यात महाराष्ट्रातील पाच जिल्हे आहेत.  यामधे औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर आणि रायगडचा समावेश आहे. आैरंगाबाद जिल्ह्यात २८ डिसेंबर २०१७ मध्ये तत्कालीन जिल्हाधकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते हा प्रोजेक्ट सुरू झाला. यात ४५०० हजार बचत गटांचे डिजिटलायझेशन करण्याचे ठरवले हाेते. आता तो आकडा ५ हजारांपर्यंत गेला आहे. त्यापैकीच गंगापूर तालुका आहे. या ईशक्ती प्रोजेक्टमुळे बचत गटांची सर्व माहिती, त्यांचा व्यवहार, बचत याची माहिती बँकेला कळते. त्यामुळे त्यांना कर्ज देणे सुलभ जाते.
- राजेंद्र महाजन, सहायक महाव्यवस्थापक, नाबार्ड